विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) जागा वाटपात महाविकास आघाडी अखेरपर्यंत चर्चेत होती, कारण आघाडीत काँग्रेस आणि उबाठा (UBT) यांच्यात जागा वाटपाचा तिढा खूपच वाढला. उबाठाचे नेते संजय राऊत १००पेक्षा अधिक जागांसाठी आग्रही होते, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आम्ही विधानसभेत १०० जागा जिंकू, शतक मारू, असे म्हटले होते. मात्र मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मविआतील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाले तेव्हा उबाठाचे शतक मारण्याचे स्वप्न भंगल्याचे स्पष्ट झाले. उबाठा (UBT) जागा वाटपात ९६ वर आऊट झाली.
(हेही वाचा Assembly Election : महायुती आणि मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, नेत्यांची दिवाळी जाणार समजूत काढण्यात)
काँग्रेस ठरला मोठा भाऊ
मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन उमेदवार दिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले होते. तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. परंतू, यामुळे पाच ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या एबी फ़ॉर्मवर अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (UBT) ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. पाच जागांवर तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार असलेले मतदारसंघ हे मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस हे आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
Join Our WhatsApp Community