राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला कोणते खाते येणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. शुक्रवारी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी महाबळेश्वरचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार का, अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
पर्यटन खात्याची जबाबदारी मिळणार?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन खात्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हे खाते दीपक केसरकर यांच्याकडे सोपवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत उदयनराजे यांना विचारले असता कोणाकडे कुठले खाते जाते हा वेगळा भाग आहे. पण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी काम करणं हे महत्वाचं आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
उदयनराजेंनी घेतली भेट
केसरकर यांच्यासोबत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारे एकमेव असे हिल स्टेशन महाबळेश्वर आहे. दरवर्षी साधारणपणे 50 लाखांहून जास्त पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. त्यामुळे महाबळेश्वरच्या अधिक विकासासाठी काम करायचे आहे. दीपक केसरकर आणि मी पूर्वीपासूनचे मित्र आहोत. त्यामुळे ही एक सदिच्छा भेट असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community