उद्रेक झाला तर सरकार जबाबदार! उदयनराजे यांचा इशारा

आज पुण्यात खासदार उदयनराजे यांनी संभाजी राजे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी काढणार असलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला.

128

राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे. सरकारमध्ये जर धाडस असेल, तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केले जाईल, अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

संभाजीराजे छत्रपती यांच्या मोर्चाला पाठिंबा!

मराठा आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजी राजे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सर्वत्र सुरू आहेत. आज पुण्यात खासदार उदयनराजे यांनी संभाजी राजे यांची भेट घेतली.
यावेळी खासदार भोसले यांनी राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. या राज्य सरकारला मराठा समाजबांधवांना आरक्षण द्यावे लागणारच आहे. केंद्राकडून आरक्षण मिळवण्याचे आम्ही बघू मात्र, राज्यातील आरक्षणाचा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवणे गरजेचे आहे. या ठिकाणी राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे, ते त्यांनी करू नये, राज्यकर्त्यांना आडवा आणि गाडा, त्यांना जाब विचारा, असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. पाच बोटे एकसारखे नसतात. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात कुणी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचलाच नाही, हे माझे ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवताय?, असा सवालही त्यांनी केला.

(हेही वाचा : ‘नानां’च्या आक्रमकतेमागे नक्की कारण काय? वाचा…)

विशेष अधिवेशन घ्यावे! – संभाजीराजे छत्रपती 

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. आम्हाला कोणत्याही स्वरूपात आरक्षण हवे आहे. विशेष अधिवेशनही घ्यावे लागले तरी चालेल. ते घ्यावे आणि कोणत्याही स्वरूपात मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे खासदार संभाजी छत्रपती यांची भेट घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.