ठाकरे ब्रँड’ पुन्हा ‘उद्धव-राज’ला एकत्र आणणार का?

157

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असे शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये मांडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी ही धडपड तर नाही ना असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सामनामधील लेखा नंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांना चांगले सुनावले आहे.

म्हणून ‘ठाकरे’ ब्रँडची चिंता वाटते

शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचे तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे” अशा शब्दांत खोपकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचे कसे  होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरे, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या अशी टीका खोपकर यांनी केली आहे.

तेव्हा खासदार मूग गिळून गप्प होते

२००८ पासून महाराष्ट्रासाठी आणि मराठी बांधवांसाठी राज ठाकरे यांनी आंदोलन उभं केले. त्यावेळी शिवसेनेचे खासदार दिल्लीत मूग गिळून गप्प बसले होते. पाकिस्तानी कलाकारांना या महाराष्ट्राबाहेर हाकलून द्यावे, अशी जेव्हा मनसेने भूमिका घेतली. त्यावेळी शिवसेनेचे नेते गप्पच होते. २०१४ आणि २०१७ निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला साद घातली. त्यावेळी सेनेच्या नेत्यांनी आमच्यासोबत दगाफटका केला. रातोरात आमचे नगरसेवक पळून नेले. त्यामुळे जो प्रश्न कृष्णाने कर्णाने केला होता. तोच प्रश्न मला इथं विचारावा वाटतोय. कर्णाचे चाक रुतले होते, त्यावेळी कृष्ण कर्णाला म्हणाला.. अभिमन्यू एकटा लढत होता, त्यावेळी तुझा धर्म कुठं गेला होता कर्णा, अशी उपमा देत देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत

ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.