विदर्भातील थंडीप्रमाणे नागपूरचे हिवाळी अधिवेशनही कडाक्यात सुरू असून, महाविकास आघाडीला उघडे पाडण्याची एकही संधी सोडायला भाजपा तयार नाही. अशावेळी माजी मुख्यमंत्री आणि ‘मविआ’चे प्रमुख नेते उद्धव ठाकरे स्वकीयांच्या मदतीला धावून येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, नागपूर विधिमंडळात येऊनही त्यांनी सभागृहाच्या बैठकीला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतेवेळी आमदारकी सोडण्याचीही घोषणा केली होती. मात्र, त्यांनी आजवर विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. २०२६ पर्यंत त्यांच्या सदस्यत्वाची मुदत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री ते नागपुरात दाखल झाले आणि मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांनी विधिमंडळ गाठले.
सुरुवातीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली. त्यात विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली. तसेच सदस्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित होते.
मिलिंद नार्वेकर दर्शक गॅलरीत
सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासंदर्भात व्यूहरचना आखल्यानंतर उद्धव ठाकरे ठाकरे विधानपरिषद सभागृहात हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर परिषदेच्या दर्शक गॅलरीत आल्याने, आता ठाकरे सभागृहात येतीलच असे तर्क पत्रकारांनी लावले. पण उपसभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करेपर्यंत ते काही पोहोचले नाहीत. ठाकरेंचा नागपूर दौरा अवघ्या दोन दिवसांचा असल्यामुळे इथून पुढेही ते सभागृहाच्या कामकाजाला उपस्थित राहणार नाहीत.
मग ठाकरे गेले कुठे?
विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांनी पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान, उद्धव ठाकरे सभागृहाच्या दिशेने जाताना दिसल्याने ते कामकाजात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सभागृहात न जाता त्यांनी नागपूर विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेथे बसून त्यांनी काही काळ कामकाज टीव्हीद्वारे पाहिले.
Join Our WhatsApp Community