मला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही, अशी माझ्यावर टीका झाली, मला नाहीच येत बाळासाहेबांसारखं बोलता. मी भाषण करतो, असं मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. मूर्ती झाल्यानंतर तिच्यावर फुलं वाहायला हवीत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनाप्रमुखांसारखे भाषण करता येत असल्याची कबुली दिली.
आदित्यला मी शिवसैनिकांवर लादणार नाही
कुणी राजकारण लादलेलं नाही. माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही. जर तुला जनतेनं स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढे जातोय. लोकांना पटलं तर ते त्याला स्वीकारतील. पक्ष एक आहे, विचार एक आहे. तो त्याच्या मार्गाने पुढे जातोय, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा यंदा मनसेचा वर्धापन दिन पुण्यातच का? जाणून घ्या कारण)
सेना नॅशनल वॉर्मिंग करत आहे
शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा आहे. त्यामुळे जाऊ, तिथे वॉर्मिंग होतंच. शिवसेना ग्लोबल नाही, तर नॅशनल वॉर्मिंग तरी करतच आहे. आवाज तोच आहे, त्यातला खणखणीतपणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वच धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात.
म्हणून युती तोडली
ज्या हेतूने आम्ही युती केली होती, तो हेतू बाजूला पडला आहे. फक्त वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता मिळाली पाहिजे यासाठी हिंदुत्वाचा देखील वापर होत आहे. काही शिवसैनिकांवर आमच्याकडूनही अन्याय झाला की त्यांना निवडणुका लढवायला देता आल्या नाहीत. तरी देखील ते शिवसेनेसोबत आहेत. आता राज्यातल्या शिवसैनिकांना लढण्यासाठी मोकळी वाट करून द्यायला पाहिजे. बघू. आमचं सत्ताप्राप्ती हे स्वप्नच नव्हतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. पण लक्षात आलं की त्यासाठी राजकारणात यावं लागेल. युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली.
Join Our WhatsApp Community