लॉकडाऊनकरता मुख्यमंत्र्यांचा २ दिवसांचा अल्टिमेटम! 

मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा, जनतेच्या जिवाचा खेळ होईल, असे राजकारण करु नका. सरकार जे पाऊल उचलत आहे, ते जनतेच्या हितासाठी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

79

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचे बघू, आज पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही, तर जग जे करत आहे तोच  पर्याय स्वीकारावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रोजगार परत मिळतील, पण जीव मिळणार नाही!

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, २ एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मी म्हणालो होतो की, परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावे लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलन सुरू झाले. कोरोना गेला, अशारितीने सगळे सुरू होते. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ-विक्राळ रुप धारण करून कोरोना आला आहे. हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील, असे देखील त्यांनी सांगितले. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव मिळणार नाही, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा : बापरे! कोरोना रुग्ण वाढले, खाटा भरल्या! )

जनतेच्या जिवाशी खेळू नका!

कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा, जनतेच्या जिवाचा खेळ होईल, असे राजकारण करु नका. सरकार जे पाऊल उचलत आहे, ते जनतेच्या हितासाठी आहे. आपल्याला जनतेचे जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवले, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला खरा, त्यात लॉकडाऊनचा इशारा दिला. लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला आर्थिक मदत काय करणार, ज्यांच्या रोजगार बुडणार त्यांच्याविषयी काय कारणार, हे सांगितले नाही. सध्याच्या परिस्थितीवर माझे नाही, तर जनतेचे अपयश आहे, असे सांगण्याचा बोलघेवडेपणा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करत ‘ते शिमगा करत आहेत’, असे म्हणाले. आम्ही शिमगा करत नाही, तर तुम्हाला जागे करत आहोत. तुमच्यामुळे राज्यात स्मशान शांतता पसरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला लॉकडाऊन करायचा आहे, तर करा पण त्याआधी लॉकडाऊनमध्ये भरडल्या जाणाऱ्या जनतेच्या पोटापाण्याचे काय, ते आधी सांगा.
– अतुल भातखळकर, आमदार

सल्ले देतात त्यांनी रोज 50 डॉक्टर, नर्सेस पुरावावेत!

आपण कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचंय, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. मधल्या काळात अनेक तज्ज्ञ सल्ले देत आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका हा नियम नको. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. मी ते सगळं करतो, पण किमान रोज ५० डॉक्टर, कर्मचारी यांचा पुरवठा महाराष्ट्रात होईल, याची सोय करा. फक्त फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल होत नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही जण म्हणतात लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावे. पण त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावे आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

तर सुविधा अपुऱ्या पडतील!

आज 45 हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली, तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बोलणारे बोलतातच. आपण लसीकरण वाढवलं पाहिजे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. देशात एकाच दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. आत्तापर्यंत आपल्या ६५ लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. आपल्या क्षमतेनुसार लशींचा पुरवठा होत नाहीये. ती मागणी मान्यही होईल, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.