उद्धव ठाकरे-दीपक केसरकर आले एकत्र; नीलम गोऱ्हेंच्या दालनात नेमके काय घडले?

118

ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले दीपक केसरकर आणि स्वतः उद्धव ठाकरे गुरुवारी एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हे दोन्ही नेते सहभागी झाले. विशेष म्हणजे दोघांच्या खुर्चीतील अंतर पाच फुटांपेक्षाही कमी होते.

मराठी भाषा भवनासंदर्भात विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी विशेष बैठक बोलावली. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीला माजी मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहीर, आमदार मनीषा कायंदे, आमदार चेतन तुपे, आमदार महादेव जानकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अमोल मिटकरी, आमदार निलय नाईक, आमदार प्रसाद लाड, आमदार धीरज देशमुख, आमदार रामदास आंबटकर, आमदार अजय चौधरी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वास्तुविशारद पी. के. दास आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. येणाऱ्या पिढ्यांना मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे. ही वास्तू मुंबईच्या सौंदर्यात भर टाकून भाषेचे वैभव वाढविणारी असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ठाकरेंना उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, याबाबत सर्वांच्या सूचना स्वागतार्ह आहेत. यामध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. या वास्तूच्या रचनेमध्ये आवश्यक बदल आणि नव्याने संरचना तयार करण्याबाबत त्यांनी संबंधिताना यावेळी सूचित केले.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवा

या बैठकीला संबोधित करताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आपण कार्यरत राहूया. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे.’

(हेही वाचा – राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यावर अजित पवारांचा आक्षेप; फडणवीस आक्रमक होऊन म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.