शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून खासदार राहुल शेवाळे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. शेवाळे यांच्या वतीने अॅड. चित्रा साळुंखे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.
दैनिक सामनामध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात राहुल शेवाळे यांचे कराचीमधल्या रिअल इस्टेटशी हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शेवाळे यांनी आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी सामनाला नोटीस पाठवून बातमीचा स्त्रोत काय आहे, असा प्रश्न विचारला होता. इंटरनेटवर चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून हे ऐकले होते आणि त्या आधारावर बातमी दिल्याचे स्पष्टीकरण सामनाने दिले होते. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.
(हेही वाचा – Narendra Modi : पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार)
मंगळवारी २७ जून रोजी दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना याप्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी खासदार राहुल शेवाळे यांचा जबाब नोंदवला. यावेळी शेवाळे यांनी सामनात प्रसिद्ध झालेला लेख पुरावा म्हणून सादर केला. तसेच सामनातल्या चुकीच्या बातमीमुळे राहुल शेवाळे यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले, असा दावा न्यायालयात शेवाळे यांच्या वकिलांनी केला. शेवाळे यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community