Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आघाडीतले ‘मोठा भाऊ’ की ‘खोटा भाऊ’?

252
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात मोठा भाऊ कोण यावरुन वाद झाले आणि उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत युतीला भरघोस मते मिळूनही वेगळी चूल मांडली. युतीत असताना त्यांना चांगल्या जागा आणि विविध पदे मिळायची, मात्र ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे वेध लागले होते. ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा हट्ट धरला, त्यावेळी त्यांच्याभोवती असलेले ठाकरे नावाचे वलय हळूहळू कमी होऊ लागले. बाळासाहेबांना याची जाणीव होती, म्हणूनच त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही आणि मुख्यमंत्री होण्याचा हट्टही धरला नाही. उलट रिमोट कंट्रोलने सत्ता राबवण्याचा ध्यास घेतला.

ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेत अनेक गोष्टी हातातून घालवल्या. यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड केले आणि पक्षच ताब्यात घेतला. आता ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला शिवसेना उबाठा म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात आधी शिवसेना या पक्षात फूट पडली आणि त्यांचे मोठे शिलेदार त्यांना सोडून गेले. तीच अवस्था पवारांची झाली. अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादी झालेली आहे. इतके सगळे होत असताना, अशोक चव्हाण हे एक मोठं उदाहरण वगळता कॉंग्रेस पक्ष एकसंध आहे. महाराष्ट्रातील कॉँग्रेस पक्ष फुटलेला नाही. तरी सुद्धा शिवसेनेने भांडून लोकसभेच्या २२ जागा मिळवल्या. आता २३ व्या जागेसाठी प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचे वलय नष्ट झाले

आता राजकीय विश्लेषकांना असे वाटत आहे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आघाडीतले ‘मोठा भाऊ’ झाले आहेत. पण का? हा प्रश्न अनेकांना पडलेला नाही. शरद पवारांनी ठाकरेंना पुढे का जाऊ दिलं? कॉँग्रेसमधल्या महाराष्ट्रातील एखाद-दुस-या नेत्याने साधी नाराजी व्यक्त करण्यापलीकडे कृती का नाही केली? कॉँग्रेसचे मालक गांधी कुटुंबाने यावर आक्षेप का घेतला नाही? इथे ‘का?’ खूप महत्त्वाचा आहे. महाभारताचं युद्ध घोषित झालं तेव्हा युद्धाचा निकाल अनेकांना माहित होता. मात्र युद्धात उतरणेही गरजेचे होते. शरद पवार यांचे चाहते त्यांना ‘तेल लावलेला पैलवान’ म्हणतात. इतके वय झाले तरी ते ज्याप्रकारे काम करतात, ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्याकडे निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे. सक्रिय असलेले महाराष्ट्रातील ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. मग या तेल लावलेल्या पैलवानाला निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे चांगलेच ठाऊक असणार. पवारांनी युती तोडली, मात्र कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री झाला नाही. कारण सरकरामध्ये जे काही घडले यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचे वलय नष्ट झाले आणि लोकांची ठाकरेंकडे पाहण्याची दृष्टीही बदलली. कोरोनाकाळातील हलगर्जीपणाचे खापर ठाकरेंच्या माथी मारले गेले. मात्र आपल्या हयातीत आपलाही पक्ष फुटेल, हे शरद पवारांच्या गावी नव्हते. इथे फडणवीसांनी पुन्हा पवारांना मात दिली.

(हेही वाचा The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी दहशतवाद्यांकडून चित्रपट निर्मात्याला धमक्या)

भारतात हिंदुत्वाची लाट आली

लोकसभा निवडणूक जिंकणे आघाडीसाठी जवळजवळ अशक्य आहे. ध्रुव राठीसारखे दलाल विदेशात बसून काहीही बोलत असले तरी ध्रुवला भारत कळलेलाच नाही. भारतात कधीही मोदी लाट नव्हती. भारतात हिंदुत्वाची लाट आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मोदी हे हिंदुत्वाचे सेनापती आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही आघाडीचा दारुण पराभव होणार आहे. हे शरद पवारांनाही माहिती आहे आणि कॉंग्रेसमधल्या जाणत्या नेत्यांनाही माहिती आहे. सोनिया गांधींनी राहुल गांधींचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी खरगेंना अध्यक्ष केले. उद्या निवडणूक हरले तर दोष खरगेंवर लावता येईल आणि थोडी जरी चांगली कामगिरी केली तर श्रेय राहुल घेऊ शकतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा भाऊ करण्यामागे हेच राजकारण आहे. ठाकरेंची विश्वासार्हता जवळजवळ नष्ट झालेली आहे. मोदींच्या नावावर शिवसेनेचे अनेक चेहरे निवडून आले. पण आता मोदींची साथ सोडली. शरद पवारांचा चेहरा दाखवून साडेतीन जिल्ह्याच्या पलीकडे जाता येत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे कितीही फॉर्ममध्ये आले असले तरी त्यांना ठाऊक नाही की पवार आणि कॉँग्रेसने त्यांचा ‘आंय, बैंगन’ केलेला आहे. ठाकरेंना अधिक जागा देऊन लोकसभेच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडण्याचा डाव आखला गेला आहे. वरवर ठाकरे हे आघाडीतले ‘मोठा भाऊ’ वाटत असले तरी ते दाखवण्यापुरते म्हणजेच ‘खोटा भाऊ’ आहेत. ठाकरेंना कदाचित विसर पडला असेल, पण उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘एखाद्याला आपटायचे असेल, तर त्याला आधी उचलावे लागते.’

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.