बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर घेतलेल्या भूमिकेला विसंगत भूमिका उबाठा गट घेत आहे. उध्दव ठाकरे हे बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत प्रतारणा करत असून बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेशी तडजोड करुन केवळ सत्ता आणि वारसदारांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्याला महत्त्व देत असल्याची टीका शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
३७० कलम हटवणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आपल्याला एक दिवस पंतप्रधान केले तर ३७० कलम हटवू असा त्यांनी सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न साकार केले. मात्र उध्दव ठाकरे ३७० कलम हटवण्याची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले, हे राज्याचे व देशाचे दुर्देव आहे, त्याचे उत्तर ठाकरे यांना राज्याला द्यावेच लागेल, उध्दव ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उदय सामंत यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात, विरोधी पक्षनेते अजित पवार मोदींचे कौतुक करतात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार की जाणार हे त्यांनाच माहित नाही, अशा परिस्थितीत आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत, यासाठी राज्यातील नेते पाटण्याला गेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
(हेही वाचा Opposition Party Meeting : विरोधकांच्या बैठकीत केजरीवाल – अब्दुलांमध्ये जुंपली; ठाकरे-पवारांची मध्यस्थी)
पाटण्यात झालेल्या बैठकीला कोणताही किमान समान कार्यक्रम नव्हता. आपापल्या मुला मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व नेते एकत्र आले होते. या बैठकीला सर्व कौटुंबिक राजकीय पक्ष सामिल झाले होते. आजची बैठक एकमेकांची उणीदुणी काढणारी होती. एका व्यक्तीला हटवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, हाच नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. विरोधकांकडे समान कार्यक्रम व कोणतीही भूमिका नसल्याने विरोधकांनी कितीही आदळाआपट केली तरी पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला… राज्यातील नेते पाटण्याला गेले खरे, मात्र राज्यातली वज्रमुठ कायम राहिल की नाही हे लवकरच कळेल, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. पाटण्याच्या बैठकीत समन्वयक नेमण्याऐवजी देशाचे नेतृत्व करु शकेल अशा नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावे, असा टोला त्यांनी लगावला. स्वतःच्या अस्तित्वाची धडपड करणारे नेते एकत्र आल्याने काहीच साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.
उबाठा गटाला राजकीय भवितव्य नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे कौटुंबिक वाद सुरु आहेत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या पक्षात अधिकार नाहीत, हे सर्व मिळून महाविकास आघाडी बनली आहे, त्यांच्याकडून काहीही धोका नाही,असे सामंत म्हणाले. ३७० कलम रद्द करण्यावर बैठकीत चर्चा झाली की नाही व त्यामध्ये ठाकरेंनी काय भूमिका घेतली हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले. अयोध्येय उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराला देखील तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे हे देखील स्पष्ट करावे असे सामंत म्हणाले. ज्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली तेच आता विरोधकांचा चेहरा बनत आहेत, हा दैवदुर्विलास असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीनंतर नितीश कुमार भाजप सोबत जाणार नाहीत याची खात्री कुणी देऊ शकेल असा अडचणीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community