शनिवारी मध्यरात्री मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राड्याचे समर्थनच केल्याची चर्चा होत आहे.
शिवसैनिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
हे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले त्यावेळी आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या राड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्या महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूची जागा देण्यात आली होती. या राड्यामध्ये अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली.
त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट दिली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्यावर देखील निशाणा साधला. अंगावर आल्यानंतर शिंगावर घेतले असं म्हणत त्यांनी सावंत यांचे कौतुक केले.
सरवणकर यांच्यावर आरोप
दरम्यान, दादर पोलिसांकडून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांचे पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण सदा सरवणकर यांनी आपल्यावरील हे आरोप खोटे असून आपल्याविरुद्ध हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community