‘आम्हाला जमीन दाखवाल तर तुम्हाला असमान दाखवू’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा हा गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासोबतच भाजपवर देखील घणाघाती टीका केली आहे.

आम्हाला जमीन दाखवायचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबईवर आता लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरू लागली आहे. पण आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झाले आहोत. त्यावेळी पातशाही सत्तांनी स्वराज्यावर आक्रमण केले. अलिकडे त्याच पातशहांच्या कुळातले आताचे शहा महाराष्ट्रात येऊन गेले. देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा करुन गेले. त्यांना माहीत नाही की इथे जमिनीतून तलवारीची पाती उगवतात आणि तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच आम्ही तुम्हाला असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मी ठणकावून सांगतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचाः ‘सध्या बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरतेय’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात)

मुंबई म्हणजे आमची मातृभूमी

मुंबईवर जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाडं कुठे असतात. मुंबई ही तुमच्यासाठी जमिनीचा तुकडा असेल पण आमच्यासाठी ही भूमी आमची मातृभूमी आहे. ही आमची मुंबा आई आहे आणि जो आमच्या आईवर वार करायला येईल त्यांचा कोथळा बाहेर काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here