बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभेची तयार अखेर पूर्ण झाली आहे. ज्या मुद्द्यावरून शिवसेनेला कायम ऐकवले जात आहे, ते म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यात यावे, या मुद्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत सोक्षमोक्ष लावतील, अशा आशयाचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे पाठवण्यात आला आले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता अवघ्या महाराष्ट्राला या सभेत मुख्यमंत्री नामांतराच्या मुद्द्यावर काय बोलणार, याविषयी उत्सुकता लागली आहे.
शिवसेनेचा दावा खरा कि खोटा?
औरंगाबाद येथील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जोरदार चर्चेत आली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विषयावर अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच शहरात आणि याच मैदानात सभा होईल, असे सांगण्यात आले होते. अनेक दिवस या सभेची चर्चा सुरु होती. अखेर ही सभा बुधवारी, ८ जून २०२२ रोजी होत आहे. या सभेच्या तयारीसाठी शहरात ‘होय संभाजीनगर आधीच झाले आहे’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नामकरणाविषयी बोलताना राज्य सरकारने नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, असे सांगितले. विशेष म्हणजे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे आला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या दाव्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या औरंबागाद मधील सभेसाठी कोरोना चाचणी बंधनकारक?)
औरंग्याच्या थडग्यावर काय बोलणार मुख्यमंत्री?
मागील महिन्यातच एमआयएमचे नेते अकरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद येथे आले तेव्हा त्यांनी औरंगजेबच्या थडग्यावर डोके ठेवले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या भागातील औरंग्याचे थडगे काढून टाका, अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर काय बोलणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा ज्या दिवशी होणार आहे, त्याच्या दोन दिवसावर राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेचा या निवडणुकीवर परिणाम होईल का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.