शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शनिवारी संध्याकाळी बुलढाण्यात सभा झाली. या सभेत ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघाले पाहिजे, म्हणून मी बुलढाण्यात आलो. काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यावर कुलस्वामिनी एकविरा देवीला गेलो आणि अयोध्येत गेलो होतो, आज ते गुवाहाटीला गेले आहेत. काही दिवसापूर्वी हात दाखवायला ज्योतिषाकडे गेले, तुमचे भविष्य ज्योतिष नाही तर दिल्लीत बसलेले घडवणार आहेत, ते उठ म्हणाले की उठायचे आणि बस म्हणाले की बसायचे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
( हेही वाचा : मुंबईतील मेट्रो स्थानके पूरमुक्त असणार! पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष यंत्रणा)
उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील आमदार आज गुहाहाटीला गेले आहेत काय झाडी, काय डोंगर सगळे ओके. त्यांना तिथे आशीर्वाद घ्यायची गरज लागली आणि मी शेतकरी आणि जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी पुन्हा जिंकणारच हा माझा आत्मविश्वास आहे. भावना गवळी यांना किती त्रास दिला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना अटक केली, पण ताई मोठ्या हुशार. त्यांनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली आणि फोटो छापून आला, लोक हे बघत नाही का असा सवाल ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत केला आहे.
राज्यपालांची बॅग पॅक करून त्यांना पाठवले पाहिजे
भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचे दिसतेय त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झाला आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यांना शिवसेनेचे नाव पाहिजे, बाळासाहेबांचे नाव पाहिजे, मोदींचे आशीर्वाद पाहिजे, तुमची मेहनत कुठे आहे? वारंवार शिवरायांचा अवमान करायचा, गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेला, काल कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकातील निवडणूक आहे. त्यासाठी उद्या महाराष्ट्र तोडतील की काय, अशी भीती वाटते. पण मिन्द्ये मुख्यमंत्री शेपूट घालून आहे. महाराष्ट्रातील बेकारी वाढवायची, महाराष्ट्र तोडून टाकायचा, सोलापूर कर्नाटकात गेले तर माझा विठोबा कर्नाटकात जाणार का, मग शतकानुशतके चाललेल्या वारीसाठी वारकरी टोल भरून जाणार का, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ घेऊन जाणार का? वीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन केला नाही आणि करणार नाही. राज्यपालांची बॅग पॅक करून त्यांना पाठवले पाहिजे, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा त्यांना सहन करत नव्हतो, त्यांच्या काळ्या टोपीखाली काय दडले आहे, ते सहन करणार नाही असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.
खोके सरकार गादीवर बसल्यापासून पणवती सुरु झाली
अब्दुल गटार हे सुप्रिया सुळे यांना शिव्या देतात, महिलेचा अपमान केला अशांना लाथ मारून हाकलून दिले पाहिजे, जसे मी एकाला हाकलून दिले होते, हे बाळासाहेबांचे विचार नाही. आज हुतात्मा दिवस असताना ते नवस फेडायला तिथे गेले आहेत, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का, शिवरायांचा अवमान होतो, महाराष्ट्र तोडण्याची गोष्ट करत आहेत, हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडा असे आव्हान ठाकरे गटाने शिंदे सरकारला दिले आहे. हे खोके सरकार गादीवर बसल्यापासून पणवती सुरु झाली आहे, हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कसले नवस फेडता. आपण शेतकऱ्यांची राहिलेली कर्जमाफी करणार होतो आणि या रेड्यांनी शेण खालले अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळी येऊ दिली नसती, शिवसेना कितीही फोडा पण माझी शिवसेना तुम्हालाच फोडून टाकल्याशिवार राहणार नाही. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही, आपण शिवरायांचे नाव घेतो, त्यांनी लढायला शिकवले आहे. या सरकारने लंडनमधून शिवरायांची तलवार आणणार अशी घोषणा केली ती तलवार पेलण्यासारखे मनगट असायला हवे तर दुसरीकडे राज्यपाल शिवरायांचा अवमान करत आहे, वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल, विराट मोर्चा काढावा लागेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
तुमच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे
संजय राऊत १०० दिवस तुरुंगातून येतात आणि जन्मठेप भोगायला तयार आहेत, या रेड्यांचे काय कर्तृत्व आहे. मी हिंदुत्वावरून लोकांना फसवले नाही काँग्रेससोबत गेलो म्हणून आरोप होत आहे पण भाजपने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती बरोबर जो संसार मंडला तेव्हा हिंदुत्व कुठे गेले. असा सवाल ठाकरेंनी केला आहे. आज तुमच्या बुडाला मंत्रिपदाची गादी चिकटली असली तरी तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसला आहे तो शेवटपर्यंत राहणार आहे या गद्दांना माफ करायचे नाही त्यांची लायकी राहिली नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोले लगावले आहेत.
Join Our WhatsApp Community