शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये विस्तव जात नाही. या दोघांमधील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन मोठ्या नेत्यांमधील ही दुश्मनी पाहता हे दोन नेते कधी एकमेकांशी गोडीने बोलतील, अशी सुतराम शक्यता नाही, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना, ‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन, पण फक्त सावंतवाडीतून बोलतोय, असे सांगा’, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांनी तोंडात बोटे घातली, पण काहीच वेळात ते ‘राणे’ कोण याचा उलगडा झाला आणि सगळ्यांचा भ्रमनिरास झाला.
राणे-ठाकरे यांच्यातील वाद १७ वर्षांपासूनचा
हे प्रकरण असे आहे की, गेल्या आठवड्यात रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात चक्क नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी, ‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन, पण फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा’, असे म्हटले. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा हा संवाद रत्नागिरीत घडला. मात्र काही वेळातच याचा उलगडा झाला की, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणारे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री राणे नव्हते, तर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामधील वाद १७ वर्षांपासूनचा आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत तर या वादाने टोक गाठले आहे. अशा पार्श्वभूमीवर नारायण राणे शिवसेनेच्या राज्यातील मंत्र्याची निधीसाठी भेट का घेतील? मुख्यमंत्र्यांशी फोनवर का बोलतील? अशी चर्चा सुरु झाली असतानाच ‘ते’ राणे ‘हे नाहीत, हे स्पष्ट झाले.
(हेही वाचा राणे आले की ठाकरे घाबरतात)
Join Our WhatsApp Community