‘हिंमत असेल तर स्वतःच्या आई-वडिलांना घेऊन मतं मागा’, उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

92

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या शिवडी येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना आवाहन केले. त्यासोबतच त्यांनी शिंदे गटातील आमदार-खासदार आणि भाजपचा देखील समाचार घेतला आहे.

स्वतःच्या नावाने मतं मागा

ज्या शिवसेनेने या सगळ्यांना मोठं केलं तेच आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. याचं कारण त्यांचे जे कर्तेधर्ते आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा शिवसेनेचा भगवा ठसा संपवून स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचं आहे, त्यामुळे त्यांनी ही फोडाफोडी केली आहे. पण ही बंडखोरी नाही ही हरामखोरगिरी आहे. जर तुमच्यात इतकी मर्दुमकी असेल तर शिवसेना प्रमुखांचा म्हणजेच माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, स्वतःच्या नावाने मतं मागा, असे थेट आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला केले आहे.

आई-वडिलांना घेऊन सभा घ्या

प्रत्येकाला आपले आई-वडील प्यारे असतात. माझ्यासोबत आज बाळासाहेब आणि माँसाहेब नाहीत. पण जे फुटून गेले आहेत त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन राज्यात सभा घ्याव्यात आणि मतं मागावीत. पक्ष आणि वडील चोरायला निघाले आहात तुम्ही, मग तुम्ही मर्द कसले दरोडेखोर आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.

भाजपवर निशाणा

जे आता मनावर दगड ठेऊन करावे लागले आहे ते अडीच वर्षांपूर्वी केले असते तर अडीच वर्षांसाठी भाजपच्या कोणत्यातरी दगडाला या पाच वर्षांत शेंदूर लागला असता. जे आज केलं ते 2019 मध्ये भाजपने केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आज जे शिवसैनिक मुख्यमंत्री केल्याच्या वल्गना करत आहेत हेच तेव्हाच का केले नाही. तेव्हाही जागावाटप 50 टक्के आणि सत्तेचं वाटप सुद्धा भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्ष ठरलं होतं. पण हा दिलेला शब्द भाजपने पाळला नाही, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.