राज्यात झालेल्या न भूतो न भविष्यति अशा सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या गटावर आरोप करण्यात येत आहेत. असे असतानाच गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा करत त्यांच्यावर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सभागृहातून उत्तर दिले. पण याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.
काय म्हणाले ठाकरे?
मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा ही सक्षम असायला हवी. मधल्या काळात केंद्राने कंत्राटी पद्धतीने कारभार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा कंत्राटी पद्धतीने का नेमू नयेत, टेंडर काढा आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करा, असे विधान मी केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घेऊन बोलत जावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः शिवसेनेची संभाजी ब्रिगेड सोबत युती, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा)
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती
संभाजी ब्रिगेडचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपण शिवसेनेला समर्थन देत असल्याची जाहीर घोषणा केली आहे. महाराष्ट्रात यापुढे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन काम करतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडचे स्वागत केले आहे. आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत त्यामुळे आपण दोघं एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community