‘नुसत्या चक्करा मारतायत पण पाळणा हलत नाही’, उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

81

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आता ठरलेली असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदारी टीका केली आहे. मातोश्रीवर झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. दोघं जण सध्या दिल्लीच्या चक्करा मारत आहेत पण पाळणा काही हलत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणाले ठाकरे?

सरकार स्थापन होऊन 40 दिवस झाले तरी दोन जणं हे सध्या दिल्लीच्या चक्करा मारत आहेत पण पाळणा काही हलत नाही. मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर देखील ते काय दिवे लागणार आहेत, ते त्यांचं त्यांना माहीत. पण मी विश्वासाने मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणत शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून सचिवांना पत्र, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय?)

गद्दारांचं नामोनिशाण शिल्लक राहत नाही

शिवसेनेशी अनेक जण गेल्या अनेक दिवसांपासून जोडले जात आहेत. महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते आणि गद्दारांना गाडते आणि या मातीची आपण सगळी लेकरं आहोत. शतकानुशतके महाराष्ट्रावर भगवा फडकत आहे. पण अनेकांनी या भगव्याच्या पाठीत वार केले आहेत. पण त्या गद्दारांचं नामोनिशाण शिल्लक राहिले नसल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

निवडणुका लढवून दाखवा

जे गद्दार शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्याच मतदारसंघात कमळ फुलवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे यांचा वापर कसा होणार आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं. ते युज अँड थ्रो होणार आहेत. असे अनेक जण आले आणि गेले त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे त्यांनी मैदानात उतरुन निवडणुका लढवून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.