‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला

152

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे अनेक आजी-माजी खासदार,आमदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील या इनकमिंगवर टीका करण्यात येत आहे.

खरे अढळ माझ्यासोबत

दरम्यान, शिवसेनेचे शिरुर येथील माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील हे देखील शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरुवारी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे बोलत होते. माझ्यासोबतची जुनी माणसं माझ्यासोबत आहेतच पण काही नवीन माणसं सुद्धा सोबत येत आहेत. शिरुरमधली काही माणसं ढळली पण जी खरी अढळ आहेत ती आजही माझ्यासोब आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी अढळराव पाटील यांच्यावर केली आहे.

(हेही वाचाः ‘अशोक चव्हाणांची ‘ती’ क्लिप आम्ही व्हायरल केली तर ते अडचणीत येतील’, शेलारांचा इशारा)

तोतयांचे बंड मोडायचे आहे

ज्या मतदारसंघामध्ये शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार माणसं आढळायला नकोत. तसा शिक्का लागणं हा शिवनेरीचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगेन की, देशातील लोकशाही टिकवणे, खरे हिंदुत्व जोपासणे,ते वाढवणे यासाठी देवाने आपल्याला दिलेली ही संधी आहे. त्यामुळे जे तोतया हिंदुत्ववाद्यांचे बंड झाले आहे ते आपण मोडून काढले पाहिजे, असा अप्रत्यक्ष टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.