जस जसे शिवसेनेचे दोन्ही काँग्रेससोबतचे सरकारमधील संबंध अधिकाधिक घनिष्ट बनत चालले आहेत, तस तसा सेनेचा भाजपविरोध अधिक घट्ट होत आहे. कालपर्यंत शिवसेनेने कधीही समस्त हिंदूंच्या शिरस्त स्थानी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली नव्हती, शुक्रवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्याला मात्र संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा नियम बाजूला करत एकप्रकारे राजकीय विचारधारेचे सीमोल्लंघन केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी तुलना होऊ लागली आहे. याची सुरुवातही नितेश राणे यांच्या ट्विटवरून झाली आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
संघावरील टीका सहन करणार नाही! – भाजप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात भाजपवर टीका करताना त्यांनी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केले. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात संघाच्या मुख्यालयात दसऱ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जे विचार मांडले, त्यांचेच उद्धव ठाकरे यांनी खंडण करून थेट त्यांच्या विचारांना विरोध केला. सेनेच्या दसरा मेळाव्यात आजवर जे घडले नव्हते ते या वर्षीच्या दसरा मेळाव्यात पहायला मिळाले. त्यामुळे साहजिकच भाजपनेही याचा तितक्याच गंभीरतेने प्रतिवाद केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘उद्धव ठाकरे यांनी भाजपवर खुशाल टीका करावी, पण संघावर टीका केलेली सहन केली जाणार नाही’, असा थेट इशारा दिला.
काय म्हटले आहे नितेश राणे यांनी?
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण संपवल्यावर लागलीच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. भाजपचे नेते नितेश राणे यांनी यावर मोजक्या शब्दांत ट्विट करून ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे यांनी ‘दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही’, असे ते म्हणाले.
After Dussehra speech..
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2021
(हेही वाचा : सत्तेच्या व्यसनावर आळा कोण घालणार? मुख्यमंत्र्यांचा सवाल)
काय म्हटले होते उद्धव ठाकरे?
- राजनाथसिंह यांनी सावरकरांवर केलेलं एक विधान वादग्रस्त ठरलं. कशाला जाताय तिकडे. सावरकर आणि गांधीजी उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? यांना गांधीजी समजलेत का सावरकर समजलेत? स्वातंत्र्य लढा सुरु होता तेव्हा तुम्ही कुठे होता, त्यात तुमचा काय सहभाग होता, आता भारत माता कि जय, वंदे मातरम म्हणत आहात, तेव्हा कुठे होतात?
- मोहन भागवत यांनी म्हटलंय की, हिंदुत्व म्हणजे काय, या आपल्या देशात सर्वांचे पूर्वज एक होते. हो आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का? आता जे काय शेतकरी आंदोलन करताहेत त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आलेत काय? लखीमपूरला जे शेतकरी दिवसाढवळ्या मारले, त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय? मोहन भागवत यांना यावर काय म्हणायचे आहे?
- लाल, बाल, पाल म्हणजे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब ही तीन राज्य स्वातंत्र्यलढय़ात पुढे होती. बंगालने त्यांचे कर्तृत्व दाखवले आहे. मी खरोखर ममताजी आणि बंगालच्या जनतेचे अभिनंदन करतो. त्यांनी जी न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे तीच जिद्द आपल्या रगारगामध्ये, नसामध्ये आहे. त्यासाठी आपली तयारी ठेवावी लागेल.
- मोहनजी म्हणतात, हिंदुराष्ट्र हा शब्द जेव्हा संघ वापरतो तेव्हा त्यात सत्तापिपासूपणा नसतो. सत्ता मिळवण्याची लालसा नसते. तर सर्वसमावेशक असा हा शब्द वापरला जातो. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा. वैचारिक लढा हवा, युद्ध नको! मग तुमच्या विचारधारेतून जी लोकं बाहेर पडली आहेत, सत्ता काबीज करून बसली आहेत, त्यांना ही शिकवणी परत लावा एकदा.
- भागवत बोलले आहेत की, झुंडबळी घेणारे हिंदू नाहीच. मग हिंदुत्व आहे तरी काय, कोणी कोणाला शिकवायचं आणि कोणाकडून शिकायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही हे आजचं सत्य असेल तर मग जेव्हा हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द हिंदुत्वासाठी उभा राहिला होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. 1992-93 साली कोणी घेतली होती जबाबदारी. आज जे छाती पुढे काढताहेत, शेपटय़ा पुढे काढताहेत ते तेव्हा त्यांच्या शेपटय़ा आत टाकून बिळात लपले होते. तेव्हा मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही, लष्कराच्या तर नाहीच नाही.