बाबरी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते असे विधान भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी खासगी वाहिनीशी बोलताना केल्यावर आता ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “गोमुत्रधारी चंद्रकांत पाटील ही आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले आहेत परंतु संतापजनक गोष्ट ही आहे की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सर्व उंदीर लपून बसले होते. तेव्हा आपल्या माननीय पंतप्रधानांचे नावही कुठे नव्हते आणि तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे असे म्हणण्यापेक्षा भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून यात भाजपाचा काही सहभाग नाही असे जाहीर केले आणि शिवसेनेकडे बोट दाखवले होते.”
भाजपने आपले हिंदुत्व स्पष्ट करावे – उद्धव ठाकरे
पुढे ठाकरे म्हणाले, “इतके वर्ष का गप्प होता? मुघलांचा इतिहास पुसता पुसता हे हिंदुंचा इतिहास सुद्धा पुसायला निघालेत. बाबरी पाडल्यावर शिवसेना सत्तेत नव्हती परंतु त्यावेळी शिवसैनिकांनी आपली मुंबई वाचवली. पोलीस आणि लष्कर सुद्धा तेव्हा शिवसैनिकांना मारत होते. तो लढा देशद्रोह्यांच्या विरोधात होता. मला एकूणच भाजपाची खरचं किव येते कारण एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात, आता मदरशांमध्ये हे कव्वाली ऐकायला सुद्धा जाणार आहेत तर दुसरीकडे बाबरी सुद्धा आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहे म्हणजे नेमकं यांचं काय करायचं? यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? जसं मी सांगतो आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही तसं भाजपने आपलं हिंदुत्व स्पष्ट करावं”, असे आव्हान ठाकरेंनी भाजपला दिले आहे.
कोणाला जोडे मारणार हे सुद्धा स्पष्ट करावे
आमच्याकडच्या मिंद्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा किंवा स्वत:चा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून ठाकरेंनी केली आहे. पुढे ते म्हणाले, “ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, शिवसेनाचा सहभाग नाही त्यांनी अडवाणींची मुलाखत ऐकावी. राममंदिराचा निकाल हा न्यायालयाने दिला आणि आता ही बिळातले उंदीर याचा फायदा घेत आहेत. आता जनतेने याचा विचार करावा की, अशा भरकटलेल्या लोकांच्या हातामध्ये आपला देश आणि भविष्य किती काळ ठेवायचं शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची यांची लायकी नाही, आता हे कोणाला जोडे मारणार हे सुद्धा स्पष्ट करावे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community