शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी रविवारी सभा घेतली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, मात्र जीवाभावाची माणसं चोरू शकणार नाहीत, तुम्ही जे प्रेम दिलंत हे कोणत्याही गद्दारांच्या नशिबात नसेल.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, “मलाचं कळतं नाही आजच्या या सभेचे वर्णन कसे करायचे आजची सभा अथांग पसरली आहे. संजय राऊत तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, आज माझ्या हातामध्ये काहीही नाही तरीही एवढी गर्दी झाली, ही सर्व पूर्वजांची पुण्याई आता एकच ब्रिदवाक्य “जिंके पर्यंत लढायचे…”
माझी जीवाभावाची माणसं तुम्ही चोरू शकत नाहीत
कोरोनाच्या काळात मी मालेगावमधील धर्मगुरू आणि मुल्ला-मौलवींशी बोलत होतो. मी माझ्या घरी बसून तुम्हाला आवाहन केले होते तरीही तुम्ही ऐकलंत. मुख्यमंत्री पद येतं आणि जातं पण तुम्ही जे प्रेम दिलंत हे कोणत्याही गद्दारांच्या नशिबात नसेल. माझं नाव, धनुष्यबाण चोरलंत पण माझी जीवाभावाची माणसं तुम्ही चोरू शकत नाहीत. गेल्यावर्षी फक्त एका कांद्याची विक्री झाली… एक खांदा जर ५० खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके मिळाले पाहिजे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत करत नाव न घेता सुहास कांदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका
“शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या आणि ही गद्दारी झाली, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सर्वप्रथम मी पाऊल उचलले माझ्यासाठी उत्तर सभा घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांना उत्तर द्या… एका शेतकऱ्याने रक्ताने पत्र लिहिले आहे परंतु कोण आवाज उठवणार बकरी केव्हा आवाज उठवते… मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात रमतात परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही. सुप्रिया सुळेंसारख्या महिलेला जे शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात” अशी सडकून टीका ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
स्वत:च्या कपाळावर गद्दार हा शिक्का घेऊन गेले
अवकाळी पाऊस झाल्यावर ज्याप्रकारे महाविकास आघाडीचे सरकार मदत देत होते त्याप्रकारे आता मदत मिळत असेल तर हात वर करा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केले. गद्दारी करून तुम्ही सरकार पाडले खंडोजी खोपडेची औलाद… गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही. हे दृश्य पाहून विचारतो तुम्ही काय घेऊन गेलात…तुम्ही माझ्यावर प्रेम करणारा एकही माणूस न नेता स्वत:च्या कपाळावर गद्दार हा शिक्का घेऊन गेले आहात. वस्त्रोद्योग कार्यालय सुद्धा हे दिल्लीला घेऊन गेले, असे हे मिंधे सरकार आहे. यामुळे मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे असा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.
निवडणूक आयोगावर टीका
“निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. खेड-मालेगावची सभा पाहून तरी तुम्ही निर्णय द्या शिवसेना कोणाची? आपण लाखोंच्या संख्येने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिली, जी माहिती मागितली ती दिली… ही शिवसेना आहे मी शिवसेनाच म्हणणार कारण माझ्या वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरलीत. तुमच्या वडिलांचं नाव लावायला तुम्हाला लाज वाटते. ज्या दिवशी केंद्राची पालखी वाहणारे न्याय व्यवस्थेत बसतील तेव्हा न्यायव्यवस्थेचे महत्त्वही संपेल.” असेही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले… मी भाजपाला विचारतो तुम्ही मिंध्यांचे नेतृत्व मानून निवडणूका लढणार का? जर तुम्हाला वाटत असेल की आपण शिवसेनेला ठाकरेंपासून तोडू शकतो तर भाजपने हे लक्षात ठेवावं की तुमचे बावन नाही तर एकशे बावनकुळे जरी खाली आले तरी शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत. फक्त प्रयत्न करून बघा… तातडीने निवडणुका घ्या हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा मी माझ्या वडिलांच्या नावे मतं मागतो, बघुया महाराष्ट्र कोणाला कौल देतो? असे आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केले आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला त्या राजकारणातील आईच्या कुशीवर वार करून हे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासमोर फिरणार आहेत. भारतीय जनता पक्षाने हे लक्षात ठेवावे जर यादी काढली तर काश्मिरपासून केरळपर्यंत तुम्ही भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेतले आहे. आमच्याकडे निरमा पावडर आहे यामुळे भ्रष्ट नेते स्वच्छ होतात असे विधान त्यांच्याच नेत्याने केले आहे. तुमच्या पक्षाचे नाव भारतीय जनता भ्रष्ट ठेवा. यांच्या नेत्यांवर टीका केली तर भारताचा अपमान, मोदी म्हणजे भारत…यांच्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले होते का? परंतु यांच्या नेत्यांवर कारवाई केली तर कुठूनही हे कारवाई करतात.”
हे तुमचं हिंदुत्व आहे का?
“शिवसेना कॉंग्रेससोबत गेली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं का? हिंदुत्वापासून लांब झालो अशी एकतरी घटना मला दाखवा, शेंडी-जाणव्याचे हिंदुत्व मला मान्य नाही, माझे वडील जे बोलायचे तेच मी बोलतोय…अनिल देशमुखांना अटक केल्यावर त्यांच्या ५ ते ६ वर्षांच्या नातीची तुम्ही चौकशी केली, लालू प्रसाद यादवांच्या सुनेची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी केली हे तुमचं हिंदुत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.” निरमा पावडर गुजरात वरून येते म्हणून आम्ही आमची बरबटलेली माणसं गुजरातला पाठवली होती. हिंडनबर्गच्या घोटाळ्यांना भाजप उत्तरही देत नाही. असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community