मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. त्यामुळे सर्व पक्ष आता सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावती येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षावर टीका केली.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. मात्र, त्या शक्तीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या. तुम्ही राजकारणातील नामर्द आहात. फक्त अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खांद्यावर बसवून पुढे आणले आहे. माझ्यावर आरोप केला जातो की मी घरी बसून होतो. पण, मी घरी बसून कोणाची घरे फोडली नाहीत. तसेच, मला घरी बसून जे काम करता आले ते काम तुम्हाला घरे फोडूनही जमत नाहीये. सत्तेत नसूनही जनता माझ्यावर अफाट प्रेम करत आहे. मात्र, तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.
(हेही वाचा – Cabinet expansion : १२ जुलैला मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार? हालचालींना वेग)
भाजपचे निष्ठावंत आता कुणाचे ओझे उचलत आहेत?
ज्या भाजपच्या निष्ठावंतांनी प्रसंगी मार खाऊन पक्ष वाढवला, त्यांच्यावरच आता विरोधकांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागत आहे. छगन भुजबळांमुळे बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात जावे लागले, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असे सांगत गद्दारांनी शिवसेना फोडली. मात्र, आता त्याच छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. आता काय सांगणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला.
शिवसेना नाव देणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्षच चोरला जात आहे. हे एक नवे राजकारण भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी अगदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे आणि ते नाव मी कुठेही जाऊ देणार नाही. कारण माझ्या वडिलांनी, आजोबांनीच हे नाव पक्षाला दिले आहे. तुम्ही चिन्ह घ्या पण पक्षाचं नाव मी कोणालाही घेऊ देणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community