सीमा प्रश्नावर काही जण सांगतात, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यात होतात, याचा अर्थ असा होत नाही की, आता तुम्ही गप्प बसावे. जोवर सीमाभाग हा केंद्रशासित होत नाही, तोवर यावर काही अर्थ नाही. हे सरकार अनैतिक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून नैतिकतेची काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहे. त्यामुळे त्यांना नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी दिल्लीला जावे लागते. एवढ्या दिल्ली वाऱ्यात सीमाप्रश्न कुठे आला? अतिवृष्टीतील शेतकऱ्यांचे कुठे पंचनामे झाले? त्यांना कुठे मदत मिळाली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केला.
ठराव करून भागणार नाही
सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असेल, तर दोन्ही राज्यांनी संयमाची भूमिका घेणे अपेक्षित आहे, पण कर्नाटक तशी भूमिका घेत नाही. त्यांनी बेळगावला उपराजधानी घोषित केले आहे. मी सभापती यांना पेन ड्राइव्ह दिला आहे, त्यात १९७०ची फिल्म आहे, त्यात १८व्या शतकातील बेळगाव येथे मराठी भाषेच्या वापराचे पुरावे त्यात दाखवले आहेत. त्यानंतर या विषयावर महाजन अहवालाचा चिरफाड करणारा बॅरिस्टर अंतुले यांच्या पुस्तकाची प्रतही दिली आहे. जोवर हा विषय न्यायालयात आहे, तोवर कुणी भूमिका मांडू नये आणि हा प्रदेश केंद्रशासित करावा, अशी आमची मागणी आहे. आता ठराव करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण आतापर्यंत किती ठराव झाले आहेत? सीमा भागात कानडी भाषेचा अत्याचार होत आहे, वीज बिलेही कानडी भाषेत दिली जात आहेत, ती भाषा मराठी भाषिकांना येत नाही त्यामुळे ते अंगठे उमटवत आहेत. त्यांच्या विधानसभेत एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव मांडला आहे. आम्हाला आमच्या हक्काची जागा हवी आहे. त्यामुळे ठराव करून भागणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा शिखांनो, भाजप आणि संघासोबत काम केल्यास याद राखा; शीख समुदाय हिटलिस्टवर)
Join Our WhatsApp Community