तोतया मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या स्मारकात स्थान नाही; उद्धव ठाकरे यांचा टोला

135

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील; पण सेनेच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्यांना स्मारकात स्थान नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी वांद्रे येथे पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी सादरीकरण केले. स्मारकाचे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या स्मारकामध्ये बाळासाहेबांचे फोटो, भाषण, व्यंगचित्रेही पाहायला मिळणार आहेत. बाळासाहेबांचे स्मारक स्फूर्तीस्थान ठरेल, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

येत्या १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या या स्मारकात कोणताही पुतळा नसेल, तर ते प्रेरणास्थान असेल. बाळासाहेबांची काही भाषणे आमच्याकडे उपलब्ध नाहीत. ती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून, मार्मिकचे सर्व अंकही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जो कोणी खचला असेल त्याला हे संग्रहालय बघितल्यावर प्रेरणा मिळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)

नेमके स्मारक आहे कुठे?

शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याजवळ हे स्मारक उभारले जाणार आहे. एमएमआरडीएकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या स्मारकाजवळ समुद्र किनारा आहे, त्यामुळे सागरी आणि पर्यावरणविषयक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. हे स्मारक उभारण्यासाठी एकही झाड तोडलेले नाही. मुख्य रस्त्यावरून ही वास्तू दिसावी, अशी अट असल्याने त्याप्रमाणे याचे बांधकाम केले जात आहे.

पुढच्या वर्षी पूर्ण होणार

स्मारकाच्या संग्राहलायत नेमक्या कोणत्या आठवणींचा समावेश करावा, यासाठी तीन सदस्यीय अभ्यासगट नेमण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचे काम या अभ्यासगटाकडून केले जाणार आहे. २०२३ च्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे स्मारक जनतेसाठी खुले केले जाईल. बाजूला समुद्र असल्याने कामात विलंब होत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.