२०१९ साली अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता, तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तेव्हा अमित शाहांनी शब्द मोडला नसता तर आता भाजपा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री प्रत्येकी अडीच वर्षे राहिला असता, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांकडून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष घडवला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “नाहीतर, याचा दुसरा अर्थ काय आहे. आता त्यांच्याकडून (भाजपा) फोडाफोडीचे जे धंदे सुरू आहेत. त्याबाबत मी काही गोष्टी एक-एक करत बोलत जाणार आहे. शिवसेना व भाजपाला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे सूत्र त्यावेळी माझं आणि अमित शाहांचं ठरलं होतं की. हे मी याआधीही माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर सांगितलं आहे.”
(हेही वाचा Khalistani : लंडनमध्येही खलिस्तानींचा भारतीय उच्चायुक्तालयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न)
“आजही पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, २०१९ मध्ये अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असंच ठरलं होतं. त्याप्रमाणे अमित शाह वागले असते तर कदाचित अडीच वर्षे भाजपाचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. पण आज भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. भाजपाचे जुने, ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी खस्ता खाल्या. त्या खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्याला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांचा पाहुणचार करावा लागत आहे,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Join Our WhatsApp Community