शिवसेना कौरवांची टोळी, उद्धव ठाकरे धृतराष्ट्र? भाजपने उडवली खिल्ली 

केंद्रीय तपास पथक प्रताप सरनाईकांना विनाकारण त्रास देते, त्यांच्या मागे शिवसेना पाठिशी उभी आहे. आम्ही महाभारतातील योद्धे आहोत आणि माझं नाव संजय आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकरणात खळबळ उडाली. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत बोलताना, ‘आम्ही महाभारतातील योद्धे असून माझे नाव संजय आहे’, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपने राऊत यांची चांगलीच खिल्ली उडवली. तसा व्हिडिओ बनवून भाजपने सोशल मीडियात व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

काय म्हटले आहे भाजपने ट्विटमध्ये? 

या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात, ‘आमचे केसं पांढरे झालेत, आम्ही महाभारताची जी उदाहरणं दिली आहेत, त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत आणि लक्षात घ्या माझं नाव संजय आहे.’ यावर भाजपने हा व्हिडिओ मुंबई भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत ‘चला, बरं झालं संजय राऊत यांनी स्वतः मान्य केलं की ते महाभारतातले संजय आहेत… लोकांनी या वक्तव्याचा असा अर्थ काढावा का, की शिवसेना म्हणजे कौरवांची टोळी आणि उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत?’, असेही भाजपने म्हटले आहे. अशा प्रकारे भाजपने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर नेम धरला आहे. संजय राऊत यांना विश्वप्रवक्ता म्हणून त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.

(हेही वाचा : योग संस्कृतीला निधर्मीयतेचा मुलामा देण्याचा अभिषेक मनू सिंघवींचा घृणास्पद प्रयत्न! )

काय म्हणाले होते संजय राऊत?

भाजपच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणा विनाकारण त्रास देत आहेत, त्यामुळे या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्या, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. या विनाकारण होत असलेल्या त्रासापासून मुक्तता कशी मिळवायची याकरता सेना सरनाईक यांच्या पाठिशी आहे. हा विनाकारण त्रास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला झाला, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाला. सत्ता गेली म्हणून विनाकारण त्रास द्यायचा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. आम्ही वाघाच्या काळजाचे आहोत, आमचे शरीर वाघाचे आणि हृदय उंदीराचे नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार आहोत, तुम्ही आम्हाला किती त्रास देणार, फारतर तुरुंगात टाकाल, तुरुंगातही आम्ही जायला तयार आहोत. आम्ही महाभारतातील योद्धे आहोत आणि माझे नाव संजय आहे, असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा : विनाकारण त्रासापासून मुक्त होण्यासाठी सेना सरनाईकांच्या पाठिशी! संजय राऊतांचा विश्वास )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here