मी शिवसंपर्क मोहीम राबवण्याचे ठरले होते, पण कोरोनाची दुसरी लाट आली, पुन्हा ठरवले तर मानेचे दुखणे वाढले, पुन्हा ठरवत आहे, तर तिसरी लाट आली, जर व्हायरस लाट आणू शकतो, तर सेनेची लाट का आणू शकत नाही? दिल्ली काबीज करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे. लवकरच मी बाहेर पडणार आहे आणि महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. हे विरोधक काळजीवाहू आहेत, त्यांना भगव्याची ताकद दाखवणार आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य पद्धतेने शिवसैनिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे शिवसेना सचिव सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले, प्रस्तावना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत हे स्क्रीनवर दिसत होते.
(हेही वाचा बाबरीनंतर सीमोल्लंघन केले असते तर आज सेनेचा पंतप्रधान असता!)
२५ वर्षे युतीत सडलो…
विरोधकांना आपण पोसले, पण २५ वर्षे त्यांच्या सोबतच्या युतीत सडलो, हे माझे मत आजही कायम आहे. राजकारणातील ते गजकरण आहेत. आपण त्यांच्यापासून का दुरावलो? आपल्याला हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती, सत्तेसाठी हिंदुत्व नको होते, त्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे. आम्ही हिंदुत्व सोडले नाही, आम्ही हिंदुत्व कधी सोडणार नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आम्ही युतीत लढलो आणि नंतर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले, म्हणून लोकशाहीचा अपमान केला, असे ते म्हणतात. माझे आव्हान आहे, आजही आम्ही एकट्याने लढू शकतो, पण त्यावेळी तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, मागे ईडीची पीडा लावायची नाही, आम्हीही आमचे अधिकार वापरणार नाही, हे आव्हान स्वीकारणार असला, तर या समोर, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
भाजपची नीती म्हणजे वापरा आणि फेकून द्या…
भाजपची नीतीच ‘वापरायचे आणि फेकून द्यायचे’, अशी आहे. प्रादेशिक पक्षांशी युती करायची आणि त्यांना संपवायचे. एकीकडे सत्तेसाठी हिंदुत्ववादी म्हणून सेनेशी युती, दुसरीकडे सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तीशी युती, तिसरीकडे नितेश कुमार यांच्याशी युती, खरे मर्द हिंदू असाल तर एक धोरण घेऊन पुढे जा. आम्हाला गुलामासारखे वागवण्याचे तुमचे धोरण मोडून आम्ही दोन्ही काँग्रेसशी युती केली, आम्ही चोरून शपथ घेतली नाही, उघडपणे युती केली, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community