मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह! बंडखोर आमदारांशी केलेला असफल संवाद! 

104
शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे हे ३५ आमदार घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा जोरदार धक्का बसला आहे. आता महाविकास आघाडी हे कधीही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी साधलेला संवाद हा असफल संवाद होता, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जो संवाद साधला आहे, तो शिवसैनिक आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधण्याचा हा असफल प्रयत्न आहे. आता आपले मुख्यमंत्री पद जात आहे, हे लक्षात येताच शेवटच्या क्षणी त्यांना ही उपरती आली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की, बंडखोर आमदार हे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. खरे तर तुम्ही स्वतः हिंदुत्वाच्या बाबतीत कुऱ्हाडीचा दांडा ठरला आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः म्हणाले होते की, जर तुम्ही काँग्रेस बरोबर जाल, तर शिवसेना बंद करेन. बाळासाहेबांचे वक्तव्य तुम्ही विसरून गेला होतात, त्यामुळे तुम्ही खरे तर कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ठरला आहात, असे मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले, असे म्हटले जात आहे, पण चेहऱ्यावर तर तसे भाव अजिबात दिसले नाही. वास्तविक ‘बंडखोर आमदार जर परत आले तर त्यांना फसवले जाईल’, असाच भाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर होता, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण हे भावनिक होते, पण मराठी माणूस भावनिक आहे परंतु मूर्ख नाही. ४० आमदार तुम्हाला सोडून गेले तरीही त्याविरोधात शिवसैनिकांचा कुठेही उद्रेक नाही. याच्यापेक्षा अजून काय स्पष्ट सांगायचे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील ओळखून निर्णय घ्यायचा असतो, झाकली मूठ सव्वा लाखाची करायची असते. हे तुम्हाला समजते पण वळत नाही.
संदीप देशपांडे, मनसे नेते

तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यासंबंधी ट्विट केले आहे, त्यामध्ये ‘हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही…
गेल्या अडीच वर्षात किती वेळा याचं सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं लागतं यातच तुमचा फोलपणा कळतो ना…’, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.