ठाकरे गट आणि शिंदे गट; या दोघांच्या दसरा मेळाव्याच्या टीझर मधून काय संदेश मिळतो?

102

कोणता दसरा मेळावा आणि कोणता हसरा मेळावा हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राला हे देखील कळेल की शिवसैनिक नक्की कोणाच्या बाजूने आहेत. महानगरपालिकेच्या महायुद्धाआधी दसरा मेळाव्याची लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अतिशय खास असतो. बाळासाहेबांच्या काळात शिवसैनिक ‘विचारांचं सोनं’ लुटायला जायचे.

( हेही वाचा : मोबाइल दिला नाही म्हणून शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं; पालक म्हणून आपण कुठे कमी पडतोय?)

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. ठाकरे-शिंदे यांच्यात आता टिझर वॉर सुरु झाला आहे. शिंदे-ठाकरे अशा दोन्ही गटाने आपला दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च केला आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टिका करत “शिवसेना एकच आहे. इतरांचे पण दसरा मेळावे होतच असतात. शिवसेनेचा मेळावा एकच शिवाजी पार्कवर. आम्हीच विचारांचे वारसदार असं सांगावं लागतं हेच दुर्दैव आहे” म्हटलं आहे.

या दोन्ही गटाच्या टीझरमध्ये एक विशेष संदेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या टिझरमध्ये बाळासाहेबांना विशेष महत्व देण्यात आलं आहे. एक नेता (बाळासाहेब ठाकरे), एक पक्ष, एक विचार, एक’लव्य’ (आनंद दिघे), एक नाथ असं या टीझरचे आकर्षण आहे. विशेष बाब म्हणजे या टिझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज आहे. सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, मग बाळासाहेब आणि नंतर आनंद दिघे. टिझरच्या शेवटी एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसतो.

थोडक्यात एकनाथ शिंदे यांच्या टिझरमध्ये बाळासाहेबांना महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या टिझरमध्ये त्यांनी स्वतःचा आवाज वापरला आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ असा ठाकरेंचे संवाद यात समाविष्ट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेब व्हायचे आहे, किंबहुना ही त्यांची खूप जुनी इच्छा होती, जी आता पूर्ण होत आहे.

शिंदेंनी ते स्थान अजून स्वतःला दिलेलं नाही, तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांनी स्वतःला बाळासाहेब समजणं यात विशेष नाही. पण आता ठाकरेंची कसोटी आहे की ज्या बाळासाहेबांच्या रक्ताचा वारसा ते सांगतात, त्यास ते योग्य आहेत की अयोग्य हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे. कारण बाळासाहेबांपुढील हिंदुह्रदयसम्राट ही उपाधी त्यांनी केव्हाच काढून टाकली आहे. कदाचित ते स्वतःसाठी एखादी उपाधी शोधत असावेत.

एकनाथ शिंदे यांच्या टीझरमध्ये बाळासाहेबांना विशेष महत्व दिलं असल्याने त्यांचं अस्तित्व जाणवतं, पण ठाकरेंच्या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंनी लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवणं आणि बाळासाहेबांचं अस्तित्व नाकारणं असा या दोन टिझरमधून अर्थ निघतो. आता महानगरपालिकेच्या निवडणूकीत पहायचे आहे की लोक कोणाला मतदान करतात, विचारांच्या वारसाला की रक्ताच्या वारसाला?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.