खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव गटाकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यांचा हा शोध आता संपला असून, आजी-माजी खासदारांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार उद्धव सेनेच्या गळाला लागला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील २०१९च्या निवडणुकीचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी सय्यद यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले.
(हेही वाचा समान नागरी कायदा म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, जावेद अख्तरांनी तोडले अकलेचे तारे)
हाजी असलम सय्यद यांनी २०१९च्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. धैर्यशील माने ५ लाख ८५ हजार ७७६ मते, राजू शेट्टी ४ लाख ८९ हजार ७३७ आणि हाजी असलम सय्यद १ लाख २३ हजार ४१९ मते, असा या निवडणुकीचा कल होता. माने आणि शेट्टी यांच्यातील मतांच्या फरकाइतकी मते सय्यद यांनी मिळवल्यामुळे दोन टर्म खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांचा पराभव झाल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
माने-शेट्टींना आव्हान देणार?
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साध्या भाजपाशी जवळीक साधून आहेत. मात्र, शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याऐवजी शेट्टींना भाजपाचे सहकार्य मिळणे जवळपास अशक्य आहे.
- त्यामुळे हातकणंगलेत पुन्हा एकदा माने आणि शेट्टी असा सामना रंगणार आहे. परंतु, यावेळेस दोघांनाही सय्यद यांचे तगडे आव्हान असणार आहे. कारण, शेट्टी यांना मिळणारा राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा आता सय्यद यांच्या पारड्यात पडणार आहे.
- शिवाय महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्यास तुल्यबळ लढत होईल. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा कोल्हापूरचा गड म्हणावा तितका ढासळलेला नाही. त्यामुळे माने यांना निवडून येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागणार आहे.