खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरू असतानाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी मिळणार यावरुन आता दोन्ही गटांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. पण दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हालाच मिळणार यावर उद्धव ठाकरे गटातील नेते ठाम आहेत.
दसरा मेळाव्यासाठी जर का शिवाजी पार्क सील केले आणि त्यापुढे जर महाराष्ट्रातील वातावरण बिघडलं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः ‘त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा’, कदमांबाबत बोलताना जाधवांची जीभ घसरली)
परवानगी कशी देणार नाहीत?
दसरा मेळाव्यासाठी कितीही संघर्ष होऊ दे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक मैदान,एक नेता आणि एक भाषण असा नारा दसरा मेळाव्यासाठी दिला आहे. तसंच आता उद्धव ठाकरे यांच्याही नेतृत्वात होणार. काहीही झालं तरी शिवतीर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार. ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे त्यामुळे मुंबई महापालिका आम्हाला परवानगी कशी देणार नाही? त्यांच्यावर कितीही दबाव असला तरी ते असं करू शकत नाहीत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
परंपरा खंडित होऊ देणार नाही
काहीही झालं तरी आम्ही सर्व शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर एकत्र जमणार. शिवाजी पार्क सील केलं तरी ते आम्ही तोडून टाकू. आमची परंपरा खंडित करण्याचा सरकारला काही एक हक्क नाही. त्यानंतर जर राज्यातलं वातावरण खराब झालं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला आहे.
Join Our WhatsApp Community