दिल्लीत शिवसेनेची पळापळ, लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट

131
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाचा उठाव दिल्लीपर्यंत पोहचला, आता शिवसेनेला लोकसभेत खिंडार पाडण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. त्यात शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सामील होतील, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच आता शिवसेनेची दिल्लीत पळापळ सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे उरलेले खासदार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
एकीकडे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता त्यांचे खासदारही फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे या गटाचे प्रतोद असतील, तसेच हे खासदार पत्र घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मंगळवारी, १९ जुलै रोजी भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे रवाना झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

काय म्हटले त्या पत्रात?

आमचे गटनेते विनायक राऊत आहेत, तसेच मूळ शिवसेना आमचीच आहे, हे या पत्रात सांगण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांना हे पत्र देण्यासाठी विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव, अनिल देसाई आणि अरविंद सावंत गेले होते. विनायक राऊत हे शिवसेनेचे गटनेते तर राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा खासदारांना व्हीप बजावण्याचा तसेच लोकसभेत कोणाला मतदान करायचे, हे सांगण्याचा अधिकार विचारे यांना आहे. तुमच्याकडे जर कोणी खासदार गटनेता किंवा प्रतोद म्हणून पत्र घेऊन आला तर त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही करू नका. आमच्या खासदारांपैकी कोणी असे पत्र घेऊन आले, तर मला माहिती द्या, अशी विनंती विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.