काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. परंतु, जाहीर सभांमधून सावरकरांच्या नावाचा वापर करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याविषयी बोटचेपी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावकर यांनी राहुल गांधींविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचे धाडसही उद्धव सेनेचे नेते वा प्रवक्त्यांनी दाखविलेले नाही. त्यामुळे त्यांच्या ‘कातडीबचाव’ भूमिकेवर चौफेर टीका होऊ लागली आहे.
(हेही वाचा हिंदु देवतांची टिंगल करणार्या वीर दासचा ‘आवाज’ मुंबईतही होणार बंद)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या राहुल गांधींविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणीही केली. याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत भूमिका विचारली असता प्रवक्त्यांची मौन बाळगणे पसंत केले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः याबाबत भूमिका स्पष्ट करतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, आधीच सावकरांच्या अवमानाबाबत सारवासारव करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून यापेक्षा अधिक अपेक्षा करण्यात अर्थ नसल्याची टीका सावरकर प्रेमींकडून केली जात आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
आमच्या पक्षप्रमुखांनी याविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे. ही किमान समान मुद्द्यांवरची आघाडी आहे. त्यातील सगळे मुद्दे एकमेकांना पटतात असे नाही, किंवा त्यातील सगळ्या मुद्द्यांवरून बिनसतेच असे नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिली. राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत, त्यांनी आधी त्याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी बोलाव्यात. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशी टीकाही त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community