मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिका-यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुणे, नवी मुंबई आणि शहापूर येथील पक्षाच्या पदाधिका-यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील ताशेरे ओढले आहेत.
ज्यांना दिलं ते गेले
आज मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतोय. आजपर्यंत जे काही देता येणं शक्य होतं ते ज्यांना द्यायचं होतं त्यांना मी दिलं. पण त्यांनी ते घेऊन काय गुण उधळले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही. ज्यांना मी दिलं ते गेले पण देणारे आता माझ्यासोबत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांना सांगितले आहे.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे ‘भावना’ दुखावल्या, प्रतोद पदावरुन हटवले)
आपलीच शिवसेना खरी शिवसेना
आताचा काळ हा कसोटीचा काळ आहे. जे गेलेत त्यांना शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे, बळकवायची आहे. पण शिवसेना ही एकच होती, एकच आहे आणि एकच राहणार आहे ती म्हणजे आपलीच शिवसेना. त्यामुळे आपल्याला आता भगवा ठामपणे हातात धरायची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community