आमच्या विरोधात राजद्रोह कायदा लावला आहे. न्यायालयानेही आमच्याविषयी आदेश दिला, तेव्हा त्या आदेशपत्रात या गुन्ह्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे फक्त ब्रिटिश कायद्यावर काम करतात, महाराष्ट्रात हिटलरशाही सुरु आहे, फक्त मोदी सरकारच ब्रिटिशकालीन कायदे रद्द करू शकते. आपल्याला बेकायदेशीररीत्या अटक केली आणि कोठडीत डांबून ठेवले होते. या सर्व प्रकरणी मी लोकसभा अध्यक्षांना कळवले आहे. त्यांच्यासमोर २३ मे रोजी आपली बाजू मांडली जाणार आहे, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर हनुमान चालीसा म्हणणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत हनुमान चालीसा म्हणावी, असे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवीन आव्हान दिले आहे. त्या दिल्लीत येथे माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंची महिलांप्रती पातळी घसरली!
लीलावती रुग्णालयात मला दाखल करण्यात आले होते, तेव्हा रुग्णालयाची जबाबदारी होती. रुग्णालय प्रशासन याची सगळी चौकशी करेल, महापालिकेचा लीलावती रुग्णालयाकडे विचारण्याचा अधिकार नाही. तरीही माजी महापौर रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांवर दबाव टाकत आहेत आणि एका महिलेच्या आरोग्याविषयी जाहीर वाच्यता करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यामुळे त्यांनी त्यांची पातळी घसरली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजाराविषयी सर्व अहवाल द्यावेत, तरच मी माझ्या आजाराविषयी माहिती देईन. खार येथील घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीची मी बिल्डर नाही. आधी कुणाचे तरी ते घर होते ते मी खरेदी केले आहे. अशा प्रकारे अनेकजण राहत असतात मी महापालिकेच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देणार आहे. अचानक उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात राणा दाम्पत्य बोलतात म्हणून त्यांच्या विरोधात राजद्रोह लावला आहे का, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंना आव्हान!
राणा दाम्पत्याने दिल्लीत त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारकडून कशाप्रकारे अत्याचार करण्यात आले, कशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याविषयी राणा दाम्पत्याने दिल्लीतील मोदीसरकारमधील विविध मंत्र्यांची भेट घेतली, तसेच गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांना सगळी कैफियत सांगणार आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीत डेरेदाखल आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली, तेव्हा खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी सभा होणार आहे. त्या सभेत त्यांनी ‘ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत याची घोषणा करावी, कारण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपण स्वतः निवडणूक लढवणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निवडणूक लढवली नाही किंवा त्यांनी कधी कोणत्या पदाची लालसा ठेवली नाही, असेही सांगायला खासदार नवनीत राणा विसरल्या नाहीत.