विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्याशी होणार आहे. त्यातच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाहूंचा अवमान केल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी बुधवारी कोल्हापुरात एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांचा अपमान करण्यात आला. त्यांना आपली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आले, असे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर राज्यसभेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. उदय सामंत यांनी या प्रकरणी भर पत्रकार परिषदेत 2 व्हिडिओ दाखवत संभाजीराजेंचा अवमान कुणी केला? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
संभाजी राजे छत्रपतींवर अनेक अटी लादल्या
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील त्यावेळेच्या अविभाजित शिवसेनेने संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती. पण त्यात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या होत्या. संभाजीराजे यांना ग्रामपंचायतीपासन लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत शिवसेनेचा (तत्कालीन) प्रचार करावा लागेल. त्यांना शिवसेनेचा आदेश बंधनकारक असेल. त्यांनी केवळ आपल्याच पक्षाची भूमिका मांडावी. विशेषतः त्यांनी पत्रकार परिषद घेन शिवसेनेचे नेते हेच माझे नेते असल्याचे जाहीर सांगावे, अशा विविध अटींचा यासंबंधीच्या ड्राफ्टमध्ये समावेश होता, असे उदय सामंत म्हणाले.
…अन् संभाजीराजे बैठकीतून उठले
ते पुढे बोलताना म्हणाले की, हा ड्राफ्ट मी स्वतः कागदावर लिहिला होता. संभाजीराजे यांनी या ड्राफ्टमध्ये काही सुधारणा सूचवल्या. त्यांनी मी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगेन असे सूचवले. शिवाय गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही काम करेन. यापुढे मला उमेदवारी द्यायची असेल तर मी जिथे राहतो त्या कोल्हापुरात येऊन द्या असे संभाजीराजे म्हणाले आणि त्या बैठकीतून उठले. त्यानंतर आणखी एक बैठक झाली. शेवटच्या बैठकीत त्यांच्यावर शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घालण्यात आली. ही अट माझ्यासाठीही एक झटका होती, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community