मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त असताना पवारांनी कशी घेतली भेट? चर्चांना उधाण

122

एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशा चर्चांना उधाण आले. पण याचबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. पण त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यामुळे कोरोनाग्रस्त असलेल्या उद्धव ठाकरेंची पवारांनी भेट कशी काय घेतली, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘मी माझा मुक्काम ‘वर्षा’वरुन मातोश्रीवर हलवत आहे’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)

कोरोनाग्रस्त असताना भेट कशी काय?

उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. मी मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाही, असं बंडखोर आमदारांपैकी एकानेही मला सांगितलं तर आता मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी माझा राजीनामा तुमच्याकडे देतो, तुम्ही तो घेऊन राज्यपालांकडे जा. मी जाऊ शकत नाही कारण मला कोरोना झाला आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले.

त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांना भेटायला शरद पवार आणि सुप्रिया सुळे पोहोचल्या. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर किमान तीन दिवस तरी विलगीकरणात राहण्याचा नियम असताना शरद पवार यांनी त्यांची भेट कशी घेतली, अशी चर्चा आता होत आहे. तसेच काँग्रेस नेते देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती मिळत असल्यामुळे आता यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

(हेही वाचाः …तर मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायलाही तयार, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन)

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल त्यांनी मला येऊन सांगा की, ‘मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे.’, मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण हे कोणीही विरोधक किंवा सोशल मीडियावर बोलल्यानंतर त्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी माझ्या शिवसैनिकांना बांधिल आहे. त्यामुळे त्यांनी मला येऊन सांगावं, मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

(हेही वाचाः अडीच वर्षांनी ठाकरे यांनी सांगितले मी मुख्यमंत्री कसा बनलो!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.