शिवसेनेतून फुटून जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर कालपर्यंत आपल्यासोबत असणारी मंडळी आता शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याचे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची अवस्था आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा अशी झाली आहे.
( हेही वाचा : आरेवरून ‘आप’ने केले आदित्यला टार्गेट; ठाकरे सरकारने मुंबईला बनवले मूर्ख )
विश्वास तरी ठेवायचा कुणावर?
शिवसेनेतून ३९ आमदार फोडत एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात करत विभागप्रमुख तसेच जिल्हाप्रमुखांच्या सभा घेण्यास उध्दव ठाकरे यांनी सुरुवात केली. त्यामुळे जे फुटून जात आहेत, त्यांच्या विरोधात आता सभा घेतल्या जात असून त्या सभांमध्ये बंडखोरांविरोधात बोलणारीच मंडळी आता त्या गटात सामील होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या दहिसरमधील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण त्याआधी रविवारी झालेल्या सभेत शितल म्हात्रे यांनी शिंदे गटाचा सडकून समाचार घेतला होता. त्यापूर्वी विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर यांनीही बंडखोरांचा निषेध करण्यासाठी केलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता आणि घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते गुवाहाटीला पोहोचले होते. त्याप्रमाणे रविंद्र फाटक हे मिलिंद नार्वेकर यांच्यासह गुवाहाटीला बंडखोरांची समजूत काढायला गेले होते. परंतु दोन दिवसांनी फाटकच शिंदे गटाता समील झाले. त्यामुळे आपल्यासोबत असणारीच मंडळी आता एकेक शिंदे गटाला पाठिंबा देत तिथे जात असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची अवस्था आता कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही अशी झाली आहे.
Join Our WhatsApp Community