‘वंचित’सोबत युतीची चर्चा : उद्धव सेनेसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर

112

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करून मतदारांना सामोरे जाण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखली असताना, एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत (कवाडे गट) युती करून उद्धव सेनेला शह दिला आहे. दुसरीकडे, ‘वंचित’ला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी तयार नसताना, प्रकाश आंबेडकर शिवसेना-वंचितच्या युतीबाबत उघडपणे भाष्य करीत आहेत. त्यामुळे उद्धव सेनेसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नव्या आघाडीचे घोडे कागदावरच अडले

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास आपली कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते माध्यमांसमोर मांडत असले, तरी पडद्यामागच्या घडामोडी वेगळ्याच संकेतांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकरांनी, सीमावादाला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार असल्याची टीका केली होती. तो आधार घेऊन या दोन्ही पक्षांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास साफ नकार कळवला आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वाट्यातील जागा वंचितला देऊ केल्यास, आमचा त्याला विरोध नसेल, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापर्यंत नव्या आघाडीचे घोडे कागदावरच अडले आहे.

(हेही वाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला)

ठाकरेंसमोर मोठा पेच 

तरीही, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीच्या चर्चा उद्धव गटाने सुरू ठेवल्या आहेत. आतापर्यंत जवळपास ८ ते १० चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील नेते प्रा. जोगेंद्र कवाडे गटाने यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अवस्थ झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना-वंचितच्या युतीबाबत माध्यमांत थेट भाष्य केले. शिवसेना देईल तितक्या जागा घेण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्टपणे नमूद करीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कोर्टात चेंडू टोलावला. त्यामुळे ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

भीमशक्ती नाराज होण्याची शक्यता

  • काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांच्या अलीकडील काही विधानांचा आधार घेत वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास साफ नकार कळवला आहे.
  • अशावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडून वंचितला सोबत घेत निवडणुकीला सामोरे जाणे, प्राप्त परिस्थितीत उद्धव ठाकरेंसाठी अवघड आहे.
  • दुसरीकडे वंचितसोबतची चर्चा थांबवून संभाव्य आघाडी तोडल्यास भीमशक्ती नाराज होण्याची शक्यता आहे. शिवाय विरोधक हाच मुद्दा उपस्थित करून ऐन निवडणुकीत कोंडी करण्याचा प्रयत्न करतील.
  • परिणामी, चहुबाजूंनी कोंडी झाल्यामुळे उद्धव सेनेसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.