एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असले, तरी उर्वरित १५ आमदार ढाल बनून उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे आहेत. पडत्या काळात आधार देणाऱ्या या निष्ठावान आमदारांची साथ यापुढेही कायम रहावी, यासाठी ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे लिहितात, “शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा व अस्मितेची महती त्यांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.”
(हेही वाचा – SpiceJet मधून SpiceXpress वेगळं होणार! काय आहे कारण, जाणून घ्या)
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे उरल्या-सुरल्या शिवसैनिकांना घेऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्याचे प्रयत्न ठाकरेंकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुखांनी निष्ठावान आमदारांना लिहिलेल्या या पत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Join Our WhatsApp Community