- प्रतिनिधी
भाजपा सोबत युती असताना गेली २५ वर्ष मुंबईत एकहाती सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ १० च जागा जिंकून आणता आल्या. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता महाविकास आघाडीतून आताच फारकत घेण्याची आग्रही मागणी शिवसेना उबाठाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे एकमुखाने केल्याने खुद्द उद्धव ठाकरे यांनीही यावर गंभीरतेने विचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत रविवारी मातोश्री निवासस्थानी पार पडलेल्या नेत्यांच्या बैठकीत दिल्याची खात्रीलायक माहिती उबाठाच्या एका ज्येष्ठ नेत्याने हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीशी अनौपचारिक गप्पांच्या ओघात बोलताना दिली.
ठाकरे यांच्या पक्षाचे एक प्रमूख नेते व प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सर्व मराठी माणसांनी भाजपा विरोधात एकत्र यावे अशी भूमिका मांडत प्रथमच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याही बाबतीत काहीशी मवाळ भूमिका घेत, पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणाने का होईना पण राज यांनीही उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) यावे अशी जी जाहीर भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली ती खरंतर अनेक वर्षांपासून तमाम शिवसैनिक व मनसैनिक करतं आलेले आहेत. त्याही पर्यायांवर आता उद्धव ठाकरे हेही गंभीरतेने विचार करत असून रविवारच्या पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनीही यावर प्रामुख्याने भर दिल्याचे या नेत्याने कोणताही आड पडदा न ठेवता स्पष्ट केले.
(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात गुरुवार, शुक्रवारी २२ तासांचा पाणी ब्लॉक)
मुंबईत असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथे राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना जबर फटका बसला. त्यातच खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनेक प्रचार सभांमध्ये मुस्लिमांनी ‘अल्ला हो अकबर’ चे नारे खुले आम दिल्याने व केवळ महाविकास आघाडीत आहोत म्हणून खुद्द शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदुहृदयसम्राट हे शब्द वगळण्यात आले, तरं इतके कमी म्हणून की काय अनेक ठिकाणी पक्षाच्या बॅनर वरून बाळासाहेबांचे फोटो ज्या पद्धतीने काढण्यात आले ते खाली काम करत असलेल्या सामान्य शिवसैनिकांच्या पचनी अजिबात पडली नाही. कारण भाजपासोबत युतीत असो वां नसो बाळासाहेबांनी नेहमीच कोणाचीही तमा न बाळगता कडवट हिंदुत्वाची भूमिका सातत्याने घेतली, मांडली, व खालपर्यंत रुजवली त्यामुळे आता सत्तेत आलेल्या भाजपाच्या अगदी शिर्सस्थ नेत्यांना दोन पावल मागे घ्यावी लागायची. आज तीच भूमिका राज ठाकरे घेताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपाने फक्त राज ठाकरे यांच्या मनसेचाच नाही तर एका बाजूला उद्धव ठाकरेंचा व दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचा पद्दतशीर गेम केला. त्यामुळें आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर कोणताही दगा होऊ द्यायचा नसेल तर एकाच वेळी बाळासाहेबांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका आपल्याला आता घ्यावीच लागेल व जर तशी घेण्यातही काही अडचणी असतील तर राज ठाकरे यांच्यासोबत आता जुळवून घ्यावेच लागेल, अशीही आग्रही भूमिका पक्षाच्या बैठकीत एकमुखी नेत्यांनी केल्याचीही माहिती या नेत्याने दिली.
खरंतरं विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत त्यांचे काहीही अस्तित्व नसताना जे अनपेक्षित यश मिळाले त्याच्यावरही या बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक नेत्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह अगदी खेडोपाडी सेनेच्या पारंपारिक मतदारांमध्ये रुजले गेल्याने त्याचाही फायदा एकनाथ शिंदे यांना ग्रामीण भागांसहित अनेक शहरी भागाततही झाल्याकडे अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. व याच चिन्हासाठी आपण येत्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी शेवट पर्यंत आग्रही रहायलाच हवे असेही ठाकरे यांच्या निदर्शनास खुलेआमपणाने आणून दिले असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले. त्यामुळे आता उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही याची गंभीरतेने दखल घेतल्याची माहितीही या नेत्याने दिली.
(हेही वाचा – Digital Arrest चा धक्कादायक प्रकार; वृद्ध महिलेला एक महिना डिजिटल कोठडी)
शिवसेना (उबाठा) पक्षासोबतची आघाडी तोडा; काँग्रेस पक्षातंर्गत सूर वाढला
विधानसभा निवडणूकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. या निवडणूकीत काँग्रेसला पक्षाला इतिहासातील सर्वात कमी जागा मिळाल्या असून हा पराभव काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या पराभवामागे शिवसेना (उबाठा) पक्षाची मते काँग्रेसकडे वळली नसल्याची तसेच शिवसेना उबाठा पक्षाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या निश्चितपणे निवडून येणाऱ्या जागा गमवाव्या लागल्याची खंत काँग्रेसचे नेते-पदाधिकारी खाजगीत व्यक्त करत आहेत. तसेच शिवसेना उबाठा पक्ष काँग्रेसच्या दलित -मुस्लिम व्होट बँकेवरच डल्ला मारत असल्याने शिवसेना उबाठा पक्षासोबतची आघाडी तोडण्याबाबत सध्या काँग्रेस पक्षांअंतर्गत सूर वाढू लागला आहे.
लोकसभा निवडणूक काळातही शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सांगलीच्या जागेवरूनही या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला होता. सांगली मतदारसंघात काँग्रेसची ताकद अधिक असल्याने ही जागा आपल्याला मिळावी अशी काँग्रेसची आग्रही मागणी होती. परंतु तिथे राजकीय ताकद नसतानाही शिवसेना (उबाठा) पक्षाने कोल्हापूर जागेच्या बदल्यात सांगलीची जागा मागून घेतली होती. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आदी काँग्रेसच्या हक्काच्या जागा शिवसेना (उबाठा) पक्षाने स्वतःकडे घेतल्या होत्या. आता विधानसभा निवडणूकीतही विदर्भातील १६ जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षात मोठा तणाव निर्माण झाला होता. ठाकरे यांनी ताकद नसतानाही विदर्भात १६ जागांची मागणी केल्याने महाविकास आघाडीचे जागा वाटप शेवटपर्यंत रखडले होते. त्यातून मविआतील विसंवाद दिसून आला होता. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्यानंतर पुढील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून पटोले यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरात यांनी बोलणी सुरु केल्याचे दिसून आले होते. याकाळात शिवसेना उबाठा पक्षाकडून काँग्रेसवर दबावाचे राजकारण खेळले जात असल्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होती.
रामटेक, अकोला पूर्व, वाशीम, बडनेरा, वणी, धुळे शहर, दक्षिण सोलापूर, पाटण, मिरज या सारख्या मतदारसंघात ताकद नसतानाही शिवसेना (उबाठा) पक्षाने या जागा लढवल्याने त्या जागा महाविकास आघाडीला गमवाव्या लागल्याचे काँग्रेस नेत्यांकडून बोलले जात आहे. तर काँग्रेस जिंकण्याची शक्यता असलेल्या वर्सोवा, भायखळा, वांद्रे पूर्व, बाळापूर या सारखे मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाने स्वतःकडे घेऊन जिंकले आहेत. परिणामी काँग्रेसचे संख्याबळ घटल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकीतही शिवसेना (उबाठा) पक्षाची मते काँग्रेसला मिळाली नसल्याने काँग्रेसने शिवसेना (उबाठा) पक्षासोबतची आघाडी तोडून यापुढे राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा सूर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाढू लागला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community