उद्धव ठाकरेंचे ठरले; ‘या’ तारखेपासून राज्यभर दौरे करणार

165

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव केल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आमागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे नियोजन केले असून, ३१ ऑक्टोबरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार, आमदार, जिल्हासंघटक, जिल्हाप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, युवासेनाप्रमुख तसेच त्या-त्या मतदारसंघातल्या विजयी आणि पराभूत उमेदवारांना हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

( हेही वाचा : दहशतवादी संघटनांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालण्याची गरज – परराष्ट्र मंत्री जयशंकर )

३१ ऑक्टोबरला परभणी, जालना, बुलढाणा आणि अकोल्यातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. १ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड या जिल्ह्यांची बैठक होईल. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव, यवतमाळ, लातूर, अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. नाशिक दिंडोरी धुळे नंदूरबार या जिल्ह्यांबाबत ३ तारखेला चर्चा होईल. या बैठकीनंतर ४ ते एकादशी तुळशी विवाहानिमित्त चार दिवस चर्चा बैठका होणार नाहीत. ७ नोव्हेंबर रोजी जळगाव, रावेर, पुणे बारामती, तर ८ नोव्हेंबरला शिरुर, मावळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ९ नोव्हेंबर रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्याचा दौरा करतील.

१० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर, शिर्डी, ११ नोव्हेंबरला सांगली, माढा, सोलापूर, साताऱ्यात, १२ नोव्हेंबरला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूरवरमध्ये पक्ष बांधणी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

मुंबईत १३ आणि १४ नोव्हेंबरला बैठका

भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्याने उद्धव ठाकरेंना यावेळी जोर लावावा लागणार आहे. त्यामुळे १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ते मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतील. या बैठका मुंबईत मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला आपापल्या विभागाचा अभ्यास करून हजर रहावे, अशी सूचना करण्यात आल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.