उद्धव ठाकरेंचे भागीदार तथा आमदार, माजी मंत्री आणि अनेक वर्षे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले रवींद्र वायकर ‘मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट’ आणि ‘सुप्रीमो बँक्वेट’च्या माध्यमातून रितसर अनधिकृत व्यवसाय करीत आहेत. ही मालमत्ता क्रीडांगणासाठी राखीव आहे. आता त्यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवरही अनधिकृत कब्जा करून, तेथे २ लाख वर्ग फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावातील जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. हा सर्व ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
रवींद्र वायकर यांनी ही जागा महल पिक्चर्स प्रा. लि. (मालक अविनाश भोसले, शहीद बालवा आणि विनोद गोएंका) यांच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेतली. बागेचे आरक्षण दाखवत ४ कोटी रेडी रेकनर मूल्याचा भूखंड ३ लाखांना खरेदी केला. त्यानंतर या प्लॉटवरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी सुप्रीमो बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
२००४-०५ मध्ये मुंबई महापालिकेशी जो करार झाला, त्यात उरलेली ६७ टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या ताब्यात म्हणजेच सामान्य जागेसाठी आरक्षित क्रीडांगण, गार्डन म्हणून घोषित करण्यात आली. वायकर यांना या जमिनीवर कोणताही टीडीआर अधिकार राहणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. मात्र, ही 67 टक्के जमीन गेल्या २० वर्षांपासून कधीच लोकांच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. तिचा वापर लग्नसमारंभासाठी केला जात आहे, असेही सोमय्या म्हणाले.
वायकरांवर उद्धव ठाकरेंची कृपा
- २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या जागेवर पुन्हा रवींद्र वायकरांचा कब्जा दाखवला आणि तेथे २ लाख वर्ग फुटाच्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली.
- वायकरांनी लगेचच हे बांधकाम सुरू केले. वाढीव क्षेत्रफळाचा लाभ देण्यासाठी ज्या जमिनीवर वायकरांचा कोणताही अधिकार नव्हता, अशी ६७ टक्के जमीन पुन्हा बीएमसीला दिल्याचे दाखवण्यात आले.
- याबाबत मी २०२१ हरकत नोंदवली. या घोटाळ्याचा पाठपुरावा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिकेने या घोटाळ्याची दाखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
- मुंबई महापालिकेने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटींचा पंचतारांकित हॉटेल घोटाळा आता उघडकीस आला आहे. या बांधकामाला तात्काळ स्थगिती आदेश मुंबई महापालिकेने द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.