केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. पक्षाचे धनुष्यबाण चिन्हही शिंदे यांच्या शिवसेनेला दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत जोरदार टीका केली. निवडणूक आयोगावरील आपला विश्वास उडाला. निवडणूक आयोग बोगस, चुना लावणारा आयोग अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला, हे आयोग पंतप्रधानांचे गुलाम असल्याचे ते म्हणाले. एखाद्या माणसाचे सर्वस्व गेल्यावर त्याची परिस्थिती अशी होणे स्वाभाविकच आहे. सगळेच हातचे गेल्यावर जी अवस्था एखाद्या व्यक्तीची होती, तीच अवस्था सध्या उद्धव ठाकरेंची झाली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि त्यातून ते असे आरोप करत आहेत.
खरेतर निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा अंकूश नसतो, हे यापूर्वी अनेकदा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे शोभनीय नाही. जर आयोगाने मनात आणले असते तर या विधानाच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असते. पण निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची मनस्थिती पाहता ते पाऊल उचललेले नाही, पण जेव्हा सर्वच जण अशा प्रकारचा आरोप करू लागले तर आयोगाचे काम कशा प्रकारे पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी त्यांना या विधानांच्या विरोधात न्यायालयात जावे लागेल. आज केंद्रीय निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, उद्या सत्ता संघर्षाचा निर्णय आल्यास त्यांच्यावर असेच आरोप केले जाणार का?
मुळात आज पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून गेला आहे, तो का गेला याचे आधी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज यंत्रणांना हाताशी धरून आमच्याशी खेळ खेळला असा आरोप जेव्हा उद्धव ठाकरे करतात, तेव्हा राज्यात सरकार असताना सरकारी यंत्रणांना हाताशी धरून आवश्यक नसतानाही केवळ बदला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक कुणी आणि कशी केली होती? कंगना राणावत यांचा बंगला महापालिकेला आदेश देत कुणी पाडला होता? नवनीत राणा दाम्पत्याला जेलमध्ये कुणी टाकले होते? हा सत्तेचा माज नव्हता का? सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कशी बेईमानी केली हे जगाला माहित आहे? त्यामुळे पक्षातच बेईमानीची बिजे रोवली गेली त्याची पाळेमुळे आणि खोड ही मुळ पक्षाला हानी पोहोचवणारच ना? उद्धव ठाकरे यांनी भाजपशी बेईमानी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले, तसेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार बाजुला घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. हिशेब बरोबर केला.
(हेही वाचा नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा सरकार स्थापण्यास पाठिंबा; शरद पवारांनी सांगितले कारण..)
आता त्यांनी आम्ही फुटलो नसून आम्ही शिवसेनेचेच असल्याचे सांगत शिवसेनेवर दावा केला. याचाच अर्थ पक्षाचे नेतृत्व त्यांना मान्य नाही. शिवसेना तीच आहे, पक्ष तोच आहे. चिन्हही तेच आहे. फक्त नेतृत्व बदल केला आहे. ठाकरेंची मक्तेदारी असलेल्या या पक्षाचे नेतृत्व शिंदे यांनी आपल्या हाती घेत पक्षप्रमुख म्हणून न राहता मुख्यनेता म्हणून पद स्वीकारले. याचाच अर्थ पक्षप्रमुख या पदावर त्यांनी दावा सांगितलेला नसून उद्धव ठाकरे यांना जर पक्ष वाचवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतच्या महायुतीचे बंधन तोडून ते गेल्यास हे पक्षप्रमुखपदही उद्धव ठाकरे यांना मिळू शकते. पण प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे हे करतील का?
सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी असलेली युती तोडली? मुळात बंद खोलीमध्ये काय घडले हे कुणालाच माहित नसताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे आश्वासन दिले होते, असे जगाला निक्षून सांगणे हेच मुळी पटणारे नव्हते. प्रमोद महाजन यांनी जेव्हा युतीची मुहर्तमेढ रोवली तेव्हाच हे ठरले होते की ज्याचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री. मग आम्हाला शाह यांनी शब्द दिला होता, याचे भांडवल करण्यामागची नक्की रणनिती काय होती हे पुढे दिसून आलीच. उद्धव ठाकरे जेव्हा शरद पवारांच्या जवळ गेले तिथेच खरे तर शिवसेनेचा अंत समोर दिसून आला होता. शरद पवार हे बाळासाहेबांचे जिवलग मित्र, पण बाळासाहेबांच्या हयातीत त्यांनी त्यांना राजकारणात कधी जवळ येऊ दिले नाही. कारण पवार निती त्यांना चांगलीच ठाऊक होती. पवार यांनी शिवसेना कशी संपवली याचे किस्से भविष्यात पुढे येतीलच. परंतु जिथे ठाकरे घराण्यातील कोणी व्यक्ती निवडणूक लढवत नाही, तिथे आदित्य ठाकरेंना वरळीतून उभे करणे, त्याच्या मागे सचिन अहिरची ताकद निर्माण करणे यामागील रणनिती कुठली हे समजायला हवे. त्याहून पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे, ती म्हणजे आदित्य ठाकरेंना निवडणूक रिंगणात उतरवून आमदार बनवणे आणि निवडून आल्यावर मंत्री बनवणे हे रश्मी उद्धव ठाकरे यांचे पहिले स्वप्न होते. पण जिथे युतीचे सरकार येत नाही तिथे महाविकास आघाडीतील मोठा पक्ष असल्याने शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद येणार हे माहित झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवण्याची सुप्त इच्छा ही रश्मी उद्धव ठाकरेंची पहिली होती, त्यात शरद पवार यांनी अजून हवा भरल्यानंतर रश्मी ठाकरे यांची दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली. परंतु मुलाला आधी आमदार बनवणे आणि नंतर पतीला मुख्यमंत्री बनवण्याचा नादात शिवसेना संपली हे मान्य करायला उद्धव समर्थक तयार होणार नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे पालकमंत्री आणि अनिल परब हे परिवहनमंत्री. पण जे निष्ठावान आमदार होते, त्यांच्या नशीबी हे मंत्रीपद का आले नाही, याचा विचार शिवसैनिकांनी केला का? शिवसेना आज फुटली, पण याचे खापर भाजपच्या माथी मारून स्वत:ची चूक झाकण्याचा प्रयत्न होत असला तरी आजही जर शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापासून आपण बाजुला होत असून ज्यांना या पक्षासोबत आघाडी केली म्हणून धनुष्यबाण गहाण ठेवला असे वाटत असेल त्यांनी आता आम्ही बाजुला झाल्यावर यावे, असे जरी एक आवाहन केले तरी बराच गेम पलटला जावू शकतो. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या स्वाभिमानाचा विचार न करता बाळासाहेबांनी वाढवलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला हवे. भलेही सत्ता संघर्ष रंगला असला तरीही या एक पाऊल मागे घेण्यामुळे बराच परिणाम दिसून दुभंगलेली शिवसेना पुन्हा एक झालेली पहायला मिळेल. पण जी शिवसेना पुढे राहिल ती लोकशाही मार्गाने आणि सनदशीर मार्गाने असेल, तिथे ठाकरेशाही चालणार नाही, तर तिथे शिवशाही असेल.
(हेही वाचा पाठ्यपुस्तकांच्या बदलाच्या निर्णयात ‘बदल’; पुढच्या वर्षी कशी असणार पुस्तके?)
Join Our WhatsApp Community