वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार – चंद्रशेखर बावनकुळे

117

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयातही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे आंदोलन खोटारडे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली.

इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल केली

बावनकुळे म्हणाले, माजी मंत्री आदित्य ठाकरे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या विषयावरून तळेगाव येथे करत असलेले आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला समंजस्य करार त्यांनी दाखवावा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला, याबाबतचा आदेश दाखवावा, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा काही जणांनी दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून ते म्हणाले की, अशा घोषणा देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करतील, याची मला खात्री आहे.

(हेही वाचा अखेर सर्व ३६ जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?)

बारामतीत घड्याळ बंद पाडण्याचा निर्धार

राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करत असून, केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. त्याप्रमाणे बारामती मतदारसंघाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आढावा घेतला. बारामती मतदारसंघात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले पाहिजे, असा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस असून लवकरच आपल्याला राजकीय स्फोट झालेला दिसेल, असे बावनकुळे म्हणाले. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला परवानगी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ही केवळ टोमणे सभा होईल आणि अनेक नेत्यांवर वैयक्तिक चिखलफेक केली जाईल. आतापर्यंत फेसबुक लाईव्हमध्ये असेच होत होते. त्यामुळे आता लोक उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत नाहीत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.