पुन्हा फुटीच्या भीतीने उद्धव सेनेकडून आमदारांवर ‘पाळत’

157

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही आमदार फुटण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेकडून खबरदारी घेतली जात असून, हिवाळी अधिवेशनातही आमदारांवर पाळत ठेवली जात आहे.

( हेही वाचा : २०२३ मध्ये IPL केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले संकेत)

दिशा सालियन प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात घेण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला खरा; पण उद्धव गटातील काही आमदारांचा सुर यावेळी मवाळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वपक्षातील आमदारांच्या बदलत्या भूमिकेची धास्ती उद्धव सेनेला वाटू लागली आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून आमदारांवर पाळत ठेवण्याची सूचना वरिष्ठ नेतृत्वाने केल्याचे कळते. हे आमदार कुठे जातात, कोणाला भेटतात, एकमेकांशी काय संवाद संवाद साधतात, यावरही बारीक नजर ठेवली जात आहे. अगदी जेवतानाही त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याची जबाबदारी संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनील यांच्यावर देण्यात आल्याचे कळते.

कोणाकोणावर पाळत?

दिशा सालियन प्रकरणाची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर उद्धव सेनेच्या आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता उफाळून येऊ नये, यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. अजय चौधरी, रमेश कोरगावकर, संजय पोतनीस, रवींद्र वायकर, सुनील प्रभू हे आमदार गुरुवारी दुपारी शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयात जेवायला बसले. त्यावेळी सुनील राऊत तेथे सोफ्यावर ठाण मांडून होते. त्यांचे जेवण आधीच झाले होते. पण हे आमदार काय बोलताहेत, यावर लक्ष ठेवण्यासाठी ते तेथे बसून होते, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.