‘अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद!’

177
अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद!
अमित शहांना मुंबईत येऊन उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद!

‘उद्या गद्दार दिन आहे. या एका वर्षामध्ये त्यांनी आपलं नाव, पक्ष चोरला… कागदावर. माझे वडीलही चोरायला निघाले होते. त्यांना वाटलं आता उद्धव ठाकरेला काय किंमत उरली आहे? पण, तरीही अमित शहांना मुंबईत येऊन भाषणामध्ये सातत्याने उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो, यातच आपली ताकद दडली आहे’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उबाठा गटाकडून षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, आज शिवसेनेला ५७ वर्षे पूर्ण झाली. ५७ वर्षांनंतरही गर्दी तशीच्या तशी आहे. ही भाडोत्री माणसे नाहीत. ही गर्दी पैसे देऊन जमावलेली नाही. ही निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे आणि तिकडे गारद्यांची गर्दी आहे. गारद्यांची टोळी म्हणजे गोंधळ घालणारी, वसुली करणारी टोळी. दुसऱ्यांना छळण्याचा आनंद या विकृतांनी जपला आहे, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केली.

अलिकडे सगळे उठून उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे करीत आहेत. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, हा समोर बसलेला उद्धव ठाकरे आहे. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोराल, पण शिवसैनिकांच्या मनातील बाळासाहेब चोरू शकत नाहीत. राम मंदिर बांधल्याचं फुकटचं श्रेय तुम्ही ढापाल, पण उद्धव ठाकरेचा जप करण्याऐवजी रामाचा जप केला, तर कदाचित तुम्हाला तो पावेल. जेवढा तुम्ही रामाचा जप करीत नाही, तेवढे तुम्ही उद्धव ग्रस्त का झाला आहात, असा सवालही ठाकरे यांनी केला. नवभक्त मिंधे आम्हाला सूर्यावर थुंकू नका म्हणून सांगतात. सूर्य कोण, तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल, पण तो मणिपूरमध्ये तो का उगवत नाही? मणिपूर पेटलेले असताना आपले पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

(हेही वाचा – Shivsena Foundation Day: वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर शिवसेनेचे सोशल मीडियावर अधिकृत पेज लाँच)

हे सरकार वाफावर वाफा सोडणारे

– हे सरकार डबल इंजिन सरकार असल्याचे ते सांगतात. पण कुठे आहे डबल इंजिन, हे सरकार तर वाफावर वाफा सोडत आहे. हास्यजत्रेपेक्षा मोठे विनोद फडणवीस करतात. कोरोनाची लस मोदींनी तयार केली असे ते म्हणाले. मग बाकी सगळे काय करत होते? खरेतर यांना डोस देण्याची गरज आहे. पलिकडे एकापेक्षा एक अवली आहेत, लवली कोणीच नाही. पण तुमच्यावर जनता कावली आहे, हे ध्यानात घ्या, असे ठाकरे म्हणाले.
– काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून टीका करता. पण, काँग्रेस सत्तेत असताना हे इस्लाम खतरेमें है म्हणायचे, आता स्वतः सत्तेवर आल्यानंतर हिंदू खतरेमे है म्हणतात. तुम्ही १० वर्षे गादी उबवत बसला असताना काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदू आक्रोश करीत असेल, तर तुम्ही सत्तेवर राहण्यास नालायक आहात, असा घणाघात उद्धव यांनी केला.
– गद्दारांच्या वाटेवर अजूनही काहीजण जात आहेत. काल काहीजण गेले. जाऊदेत. पण, माध्यमांना एक विनंती आहे, कोणीतरी उठून जातं आणि लगेच उद्धव ठाकरेंना धक्का म्हणका, कसला धक्का? जपानमध्ये एक दिवस भुकंप नाही झाला तर लोकांना धक्का बसतो, तरीही जपान उभं राहतं आहे.
– शिवसेना तर धक्का प्रुफ आहे. बिकाऊ, भाडोत्री जे कोणी असतील, ते आणखीही घेऊन जा.मला त्या गद्दारांना इतकंच सांगायचं आहे, तुम्ही मला यादी द्या, मी तुम्हाला ती माणसं पाठवून देतो, असेही ठाकरे म्हणाले.

आयत्या बिळावर नागोबा…

– आयत्या बिळावर फणा काढून बसलात, म्हणजे नागोबा झालात असे समजू नका. भाजपावाले थोडे दिवस दूध पाजतील, पुंगी वाजवतील. पण काम संपले की सगळं काढून घेतील. तुम्ही सत्तेत आल्यापासून जेवढा खर्च जाहीरातींवर केला, तेवढी मदत शेतकऱ्यांना केली असती, तरी त्यांचे भले झाले असते, असेही ठाकरे म्हणाले.
– मला प्रत्येक क्षणाला वाटतं की शिवसेनाप्रमुख आपल्याकडे बघत आहेत. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत. ते असा विचार करीत असतील, की ज्यांच्यासाठी मी आपलं जीवन ओवाळून टाकलं, अतिरेक्यांचं सगळं संकट, धमक्या अंगावर घेऊन ही फौज मी उभी केली, ती या संकटाला कसे तोडून मोडून टाकते, हे ते बघत आहेत.
– शिवसेनेला आव्हानं काही नवीन नाहीत. आजपर्यंत अनेकांनी आपल्याला आव्हान दिले. आताचं आव्हान हे आपल्यातील हरामखोरांनी दिलेच आहे, पण एकेकाळच्या मित्रांनीही दिलेले आहे. हे आव्हान आपण मोडायचंच आणि आव्हान देणारा शत्रूही शिल्लक ठेवायचा नाही. कारण, हे आपल्या आयुष्यातील शेवटचं आव्हान. शिवसेनाप्रमुखांनी जशी सगळी आव्हाने परतवून लावली, तशीच शिवसेनाप्रमुखांचा पूत्र म्हणून सगळी आव्हाने मी तुमच्या साथीने परतावून लावीन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.