ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खेडमध्ये भव्य जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. तसंच यावेळी उद्धव ठाकरेंनी सभेतून खेडमधील जनतेला भावनिक हाकही दिली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘आपलं दुर्देव असं की, ज्यांना आपण कुटुंबिय मानलं, ज्यांना तुम्ही मोठं केलंत. त्यांनीच आपल्या आईवरती वार केला आहे. होय, शिवसेना आमची आई आहे. जर शिवसेना ही चार अक्षर नसती, तर तुम्ही आम्ही कोण होतो. आणि आज जे टीमक्या वाजवताहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. शिवसेना नसती तर हे कोण असते,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला.
भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटीवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, तेव्हा त्यांच्यामागे शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. पण भाजपच्या मागे बाळासाहेब उभे नसते तर काय झालं असतं. आता ज्यांनी सोबत दिली, त्यांनाच पहिले संपवत आहेत. पण त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा.’
निवडणूक आयोगावर ठाकरेंनी साधला निशाणा
‘मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा चुना लगाव आयोग आहे. ते सत्येचे गुलाम आहेत. वरुन जो हुकूम येतो त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयोग म्हणायच्या लायकीचे नाहीत हे मी उघडपणे बोलतोय. कारण निवडणूक आयोगानं या तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाहीत,’ असं म्हणत उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला.
(हेही वाचा – रामदास कदम म्हणजे ‘तात्या विंचू’, एकेरी उल्लेख करत भास्कर जाधवांचा कदमांवर घणाघात)
‘जनतेनं सांगितलं की, घरी जा तर मी घरी जाईन’
‘धनुष्यबाण चोरला तर तुम्ही समोर या मी समोर येतो, महाराष्ट्र जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. तुम्ही सांगितले की, घरी जा तर मी घरी जाईन, पण निवडणूक आयुक्त सांगतील तर मी त्यांना घरी पाठवेन. मी माझ्या देशाला पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात अडकू देणार नाही, अशी शपथ घ्या’,असेही ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community